प्राची सोनवणे / नवी मुंबईसर्वाधिक आंबा विक्री ही नवी मुंबई बाजार समितीमध्ये होत असून सिझन सुरू होताच बाजारात फळांच्या राजाची मागणी सुरू होते. गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर यंदा बाजारात ६७ हजार ३९२ क्रेट आंब्याच्या पेटींची आवक झाली आहे. दिवसाला ३१३ ट्रक आणि टेम्पोची आवक होत असून यामध्ये कोकण आणि कर्नाटकी आंब्याचा समावेश आहे. नोटाबंदीनंतर बाजारपेठेवर मोठा परिणाम झाला असला तरी आंब्याची चव चाखण्यासाठी मात्र ग्राहकांनी बाजारपेठेत गर्दी केली आहे. यंदा आंब्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले आहे. आंब्याचे दर नियंत्रणात असल्यामुळे ग्राहकांकडून अपेक्षित मागणी होत असल्याची प्रतिक्रिया व्यापाऱ्यांनी व्यक्त केली. दक्षिणेकडून येणारा हापूस हलक्या प्रतिचा आहे. परंतु त्याचा भाव कमी असल्याने व्यापारी तो आंबा खरेदी करून घेवून जात असून ग्राहकांना देवगड हापूसच्या नावाने विक्री केली जात आहे. ग्राहकांनी आंबा घेताना फसवणूक होणार नाही याची पुरेपूर काळजी घ्यावी, असे आवाहन व्यापारी वर्गाकडून करण्यात आले आहे. अधिकृत व नियमित फळ विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांकडूनच आंबा खरेदी करावा, असे आवाहन केले आहे. गेल्या वर्षी ४० हजार पेट्यांची आवक झाली होती, यंदा मात्र यामध्ये वाढ झाली असून ६७ हजार पेट्यांची आवक झाल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. फळ बाजारातील व्यापारी संजय पानसरे यांनी दिलेल्या माहितीनुसार आठवडाभरापासूनच बाजारातील आवक वाढली असून कर्नाटकी तसेच कोकणातील हापूस, बदामी, पायरी, तोतापुरी, केसर, लालबाग यांनाही मागणी आहे. वाशीतील घाऊक बाजारपेठेत कर्नाटकी हापूस ५० ते १०० रुपये किलो या दराने आहे. कोकणातील हापूस आंबा ९० ते २०० रुपये, बदामी ४० ते ६० रुपये किलो, लालबाग २० ते २५ रुपये किलो, तोतापुरी १५ रुपये किलो आणि केसर १०० रुपये किलो या दराने उपलब्ध आहे.दर स्थिर राहणार नोटाबंदीचा परिणाम बाजारातील व्यवहारांवर असला तरी देखील आंब्याची मागणी मात्र घटलेली नाही. गेल्या वर्षीच्या तुलनेत उत्पन्न वाढले असून त्याबरोबरीनेच ग्राहकांची मागणीही वाढत आहे. मागणी वाढली असली तरी दर मात्र स्थिर राहणार अशी माहिती उपसचिव व बाजार समिती अधिकारी सीताराम कावरके यांनी दिली.
कोकण, कर्नाटकी हापूसला मागणी
By admin | Published: March 28, 2017 5:31 AM