दिव्यांग विद्यार्थ्यांना मोफत बस सुविधा देण्याची मागणी
By admin | Published: May 9, 2017 01:32 AM2017-05-09T01:32:04+5:302017-05-09T01:32:04+5:30
शहरातील दिव्यांग विद्यार्थ्यांना घरापासून शाळेपर्यंत मोफत प्रवास करता यावा याकरिता नवी मुंबई महानगरपालिकेच्या
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : शहरातील दिव्यांग विद्यार्थ्यांना घरापासून शाळेपर्यंत मोफत प्रवास करता यावा याकरिता नवी मुंबई महानगरपालिकेच्या परिवहन विभागाने प्रवासाची विशेष सवलत द्यावी, अशी मागणी शिवआधार चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात परिवहन सभापती, परिवहन व्यवस्थापक, महापौर तसेच आयुक्त यांना लेखी निवेदन देण्यात आले आहे.
शिवआधार चॅरिटेबल ट्रस्ट या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष गणेश शेळके यांनी दिव्यांग मुलांसाठी नमुंमपामार्फत असलेल्या योजना व सवलतींबाबत पालकांमध्ये असलेल्या जनजागृती पातळी तपासणे हा संशोधन अहवाल तयार करत असताना ही बाब निदर्शनास आली. दिव्यांग मुलांना मोफत प्रवासाची सवलत नसल्यामुळे पालकांमध्ये नाराजी आहे.
एनएमएमटीत दिव्यांगांना ७५ टक्के सूट असली तरी ती २५ रुपये तिकिटावर आहे. घरापासून शाळेत जाण्यासाठी १० ते १२ रुपये तिकीट असल्यास त्यांना सात रुपयांचे तिकीट काढावे लागते. त्यांच्यासोबत पालकांना पूर्ण तिकीट घ्यावे लागते. हा खर्च सर्वसामान्य पालकांना परवडणारा नाही. म्हणून दिव्यांग विद्यार्थ्यांना मोफत प्रवासाची सवलत द्यावी, अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबातील पालकांना हा आर्थिक भार पेलवत नाही. त्यामुळे दिव्यांग मुले शिक्षणापासून वंचित राहतात. काही विद्यार्थी गैरहजर राहतात तर काही पालक विद्यार्थ्यांना शाळेतून काढून टाकतात.या कारणांमुळे शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या दिव्यांग बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी दिव्यांग विद्यार्थ्यांना मोफत एनएमएमटीमध्ये प्रवास करण्यासाठी सवलत दिली जावी, अशी मागणी करण्यात आली आहे.