वाशीतील एमजीएम हॉस्पिटलवर सायबर हल्ला, बिट कॉइनच्या स्वरूपात खंडणीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 06:02 AM2018-07-18T06:02:53+5:302018-07-18T08:29:16+5:30
वाशीतील एमजीएम रुग्णालयातल्या संगणक प्रणालीवर सायबर हल्ला झाल्याचा प्रकार घडला आहे.
नवी मुंबई : वाशीतील एमजीएम रुग्णालयातल्या संगणक प्रणालीवर सायबर हल्ला झाल्याचा प्रकार घडला आहे. हॅकर्सने तिथली संगणकीय यंत्रणा ठप्प करून बिट कॉइन स्वरूपात खंडणीची मागणी केली आहे. या प्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मागील काही दिवसांपासून शहरात सायबर हल्ल्याच्या घटना वाढू लागल्या आहेत. रविवारी रात्री अचानकपणे वाशीतील एमजीएम रुग्णालयातील संगणक प्रणाली ठप्प होऊ लागली. काही वेळातच हा सायबर हल्ला असल्याचे रुग्णालय प्रशासनाच्या निदर्शनास आले. अज्ञात व्यक्तीने तिथली संपूर्ण संगणकीय यंत्रणा ठप्प करून सायबर हल्ला झाल्याचे संदेश संगणकावर दिले, तसेच या हल्ल्यातून सुटकेसाठी खंडणीचीही मागणी केली. याकरिता त्याने स्वत:चा ईमेल आयडीही दिलेला आहे, त्यानुसार रुग्णालयाच्या वतीने गुन्हे शाखेच्या सायबर सेलकडे तक्रार देण्यात आलेली आहे.
त्यानुसार वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. हा सायबर हल्ला रुग्णालयाच्या संगणकीय प्रणालीच्या सुरक्षेतील त्रुटीमुळे झाल्याची शक्यता गुन्हे शाखा उपआयुक्त तुषार दोशी यांनी वर्तवली आहे, तर हॅकरने खंडणीच्या रकमेचा उल्लेख केलेला नसून केवळ बिट कॉइन स्वरूपात खंडणीची मागणी केलेली आहे, त्याकरिता संपर्कासाठी दिलेल्या ईमेल आयडीच्या आधारे हॅकरचा शोध सुरू असल्याचेही दोशी यांनी सांगितले.
संगणक प्रणाली हॅक करण्याचे प्रकार सुरूच
गेल्या वर्षी शहरात झालेल्या सर्वात मोठ्या सायबर हल्ल्यात जेएनपीटीच्या एका बंदरातील संपूर्ण संगणकीय यंत्रणा काही दिवसांकरिता ठप्प झाली होती. संबंधिताने आभासी चलनाच्या स्वरूपात खंडणीची मागणी केली होती. त्यानंतर काही दिवसांतच नवी मुंबई पोलिसांचे संकेतस्थळच हॅक झाल्याचा प्रकार घडला होता. यामुळे आॅनलाइन संगणकीय प्रणालीवर आधारित उद्योग व्यावसायिकांपुढे आधुनिक गुन्हेगारी पद्धतीचे संकट निर्माण झाले आहे. अशातच काही दिवसांपूर्वी खारघरच्या एका हॉटेलवरील सायबर हल्ल्यानंतरचा दुसरा सायबर हल्ला वाशीतील रुग्णालयावर झाला आहे.