मागासवर्गीय अधिकाऱ्यांवरील अन्याय दूर करण्याची मागणी
By admin | Published: November 22, 2015 12:48 AM2015-11-22T00:48:39+5:302015-11-22T00:48:39+5:30
महापालिकेमधील मागासवर्गीय व इतर मागासवर्गीय अधिकाऱ्यांना पदोन्नतीमध्ये डावलले जात आहे. हा अन्याय दूर केला जावा व अनेक प्रलंबित प्रश्न सोडविण्याची मागणी
नवी मुंबई : महापालिकेमधील मागासवर्गीय व इतर मागासवर्गीय अधिकाऱ्यांना पदोन्नतीमध्ये डावलले जात आहे. हा अन्याय दूर केला जावा व अनेक प्रलंबित प्रश्न सोडविण्याची मागणी मागासवर्गीय व इतर मागासवर्गीय अधिकारी कर्मचारी महासंघाने केली आहे.
महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी पालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांची भेट घेऊन त्यांना प्रलंबित प्रश्नांविषयी माहिती दिली. महापालिकेमधील सेवाज्येष्ठता यादी, प्रलंबित पदोन्नत्त्या, सेवाशर्ती, नियमावली व आकृतीबंध या विषयावर चर्चा करण्यात आली. पालिकेत मागासवर्गीय अधिकाऱ्यांवर अन्याय होत असल्याचे संघटनेने निदर्शनास आणून दिले. संघटनेचे मानद सचिव रवींद्र सावंत यांनी डॉ. रमेश निकम यांना पदोन्नती दिली जात नाही. पदोन्नतीबाबत त्यांच्यावर अन्याय केला जात आहे. ज्यांनी पालिकेची नोकरी सोडून विदेशात गेले व परत पालिकेत रुजू झाले त्यांना मुख्य आरोग्य अधिकारी करण्यात आले आहे. परंतु सुपरस्पेशालिटीसाठी गरीब रुग्णांना काहीच उपयोग होत नसल्याने हिरानंदानी रुग्णालयावर कारवाई करणाऱ्या निकम यांच्या कामाचे कौतुक होण्याऐवजी त्यांना डावलले जात असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.
आयुक्तांनी महासंघाने मांडलेले प्रश्न तत्काळ सोडविण्याचे आश्वासन दिले आहे. निकम यांच्या पदोन्नतीचा प्रस्ताव १५ दिवसांमध्ये सादर करण्याच्या सूचना प्रशासनास दिल्या. यावेळी शशिकांत आवळे, संघटनेचे सचिव डॉ. कैलास गायकवाड, डॉ. वैभव झुंजारे, मदन वाघचौडे, जयंत कांबळे, संध्या अंबादे, डॉ. दयानंद बाबर, प्रवीण गाडे, राजेश ओहळ, विलास चाकूर, रवींद्र सावंत व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
पालिकेमध्ये मागासवर्गीय व इतर मागासवर्गीय अधिकारी, कर्मचाऱ्यांने अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. डॉ. रमेश निकम यांच्यासारख्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांवरही अन्याय होत आहे. हे सर्व प्रश्न सोडविण्याची व अन्याय दूर करण्याची मागणी आयुक्तांकडे केली आहे.
- रवींद्र सावंत, मानद सचिव, मागासवर्गीय महासंघ