धक्कादायक ! मृतदेह गुंडाळण्यासाठी ४ हजारांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2021 01:12 AM2021-05-02T01:12:36+5:302021-05-02T01:13:25+5:30
पालिका रुग्णालयात पैशासाठी अडवणूक
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : वाशी येथील पालिका रुग्णालयात पैशासाठी मृतदेहांची अडवणूक होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. आपल्याच रुग्णवाहिकेतून मृतदेह घेऊन जायचा अशी मक्तेदारी गाजवली जात आहे. तर मृतदेह गुंडाळून देण्यासाठी ४ हजार रुपयांची मागणी होत आहे. या प्रकरणाला सामोरे गेलेल्या व्यक्तीने पालिका आयुक्तांकडे तक्रार करून कारवाईची मागणी केली आहे.
वाशी येथील प्रथम संदर्भ रुग्णालयात हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गुरुवारी घणसोली येथे राहणाऱ्या अनुज दिवाकर याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पालिका रुग्णालयात आणला. शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह त्याच्या इलाहाबाद येथील मूळ गावी नेला जाणार होता. यासाठी त्याच्या भावाच्या परिचयाच्या व्यक्ती आर्थिक मदत करणार होत्या. परंतु शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह गुंडाळून ताब्यात देण्यासाठी तिथल्या कर्मचाऱ्यांनी चार हजार रुपयांची मागणी केली. शिवाय पैसे न दिल्यास मृतदेह आहे त्या स्थितीत घेऊन जा, अशी अरेरावी केली. अखेर तडजोड करून त्यांनी २ हजार रुपये घेऊन मृतदेह गुंडाळून दिला. मात्र त्यानंतर मृतदेह इलाहाबाद येथे घेऊन जाण्यासाठी रुग्णालयाच्या आवारातल्या रुग्णवाहिका व्यावसायिकांनी ४५ ते ५० हजार रुपयांपर्यंतचे दर सांगितले. यामुळे ओळखीतून स्वस्तात ठरवलेली रुग्णवाहिका रुग्णालयाच्या आवारात येताच तिथल्या रुग्णवाहिका व्यावसायिकांनी दमदाटी करून मक्तेदारी दाखवण्यास सुरुवात केली. रुग्णालयातून मृतदेह बाहेर न्यायचा असेल तर आपलीच रुग्णवाहिका ठरवावी लागेल, असा दमदेखील भरल्याचा आरोप बोनकोडे येथील रहिवासी प्रदीप म्हात्रे यांनी केला आहे.
मृत्यूनंतरही झाले हाल
अनुज दिवाकर हा घणसोली सिम्प्लेक्स येथे पत्नीसह राहायला होता. त्याचा इस्त्रीचा व्यवसाय होता. डिसेंबरमध्येच त्याचे लग्न झाले होते. परंतु गेल्या महिन्यात पुन्हा शासनाने कठोर निर्बंध केल्याने ओढवलेले संकट व त्यातून घरी वाद सुरू होते. यामुळे गुरुवारी सकाळी त्याने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. मात्र मृत्यूनंतरदेखील त्याच्या मृतदेहाला गावी पोहोचण्यासाठी पैशासाठी अडवणूक सहन करावी लागली.