महापालिकेत समाविष्ट २९ गावांत अग्निशमन यंत्रणा उभारण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 02:45 AM2018-03-19T02:45:48+5:302018-03-19T02:45:48+5:30
पनवेल महापालिकेत समाविष्ट २३ ग्रामपंचायतींमधील २९ गावांमध्ये कोणत्याही स्वरूपाची अग्निशमन यंत्रणा सद्यस्थितीला कार्यान्वित नाही. विशेष म्हणजे आपत्कालीन परिस्थितीत याठिकाणी दुर्घटना घडू शकते.
पनवेल : पनवेल महापालिकेत समाविष्ट २३ ग्रामपंचायतींमधील २९ गावांमध्ये कोणत्याही स्वरूपाची अग्निशमन यंत्रणा सद्यस्थितीला कार्यान्वित नाही. विशेष म्हणजे आपत्कालीन परिस्थितीत याठिकाणी दुर्घटना घडू शकते. याकरिता पालिकेने पुढाकार घेऊन आपत्कालीन यंत्रणा उभारण्याची मागणी शेकाप नगरसेवक गुरु नाथ गायकर यांनी पालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांच्याकडे केली आहे.
२९ गावांत विविध शासकीय कार्यालये आहेत. यामध्ये शाळा, चावड्या, दवाखाने तसेच विविध करमणुकीची ठिकाणे आहेत . प्रत्येक घरात पालिकेला अग्निशमन यंत्रणा पुरविणे शक्य होणार नाही. मात्र प्रत्येक गावाचा विचार करून गावासाठी अग्निशमन संच, अथवा यंत्रणा उपलब्ध करून दिल्यास गावकरी आपत्कालीन परिस्थितीला तोंड देऊ शकतात. याकरिता पालिकेने योग्य तो विचार करून ग्रामीण भागात सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्याची मागणी नगरसेवक गुरु नाथ गायकर यांनी केली आहे.
विशेष म्हणजे यंदाच्या अर्थसंकल्पात ग्रामीण भागासाठी विशेष तरतूद करण्याची मागणी देखील गायकर यांनी केली आहे. पालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी देखील या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.