नवी मुंबईत एसटी बस आगाराची मागणी
By admin | Published: April 28, 2017 12:42 AM2017-04-28T00:42:32+5:302017-04-28T00:42:32+5:30
कोकण आणि महाराष्ट्रात ये-जा करणाऱ्या एसटीच्या बसेस नवी मुंबई परिसरातूनच मार्गक्रमण करतात. मात्र या एसटी प्रवाशांना
नवी मुंबई : कोकण आणि महाराष्ट्रात ये-जा करणाऱ्या एसटीच्या बसेस नवी मुंबई परिसरातूनच मार्गक्रमण करतात. मात्र या एसटी प्रवाशांना मूलभूत सेवा पुरविल्या जात नसल्याची नाराजी शेकापच्या शिष्टमंडळाकडून व्यक्त करण्यात आली आहे. गुरुवारी या शिष्टमंडळाने राज्य मार्ग परिवहन मंडळाला भेट देत प्रवाशांना मूलभूत सोयी-सुविधा पुरविण्याची मागणी करत निवेदन सादर केले.
नवी मुंबई परिसरातील बहुसंख्य नागरिक एसटीने प्रवास करत असूनही याठिकाणी असलेल्या एसटी थांब्यांवर मूलभूत सुविधा पुरविल्या जात नसल्याची तक्रारही शेकापच्या शिष्टमंडळाने केली आहे. नवी मुंबईत एसटीचे आगार सुरू करून त्याठिकाणी प्रवाशांकरिता मूलभूत सुविधा पुरवाव्यात, अशी मागणी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष तसेच व्यवस्थापकीय संचालक रणजित सिंग देओल यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. शेकापचे नेते माजी आमदार विवेक पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्य महामार्ग परिवहन मंडळाची भेट घेऊन प्रवाशांच्या गैरसोयी निदर्शनास आणल्या. एसटी बस थांब्यावर शेड्स, पाणपोई अशा मूलभूत सुविधा तसेच शहरात एसटी आगार उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देओल यांनी दिले. यावेळी शेकापचे ठाणे लोकसभा विभाग अध्यक्ष अॅड. मंदार मोरे, जिल्हाध्यक्ष गौतम आगा, किसन संकपाळ उपस्थित होते.