वासांबे मोहोपाडा हद्दीत शंभर बेडचे रुग्णालय सुरू करण्याची मागणी;मनोहर भोईर यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2020 12:04 AM2020-07-19T00:04:34+5:302020-07-19T00:07:45+5:30
उपचार शहरातच मिळतील
मोहोपाडा : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी लॉकडाऊन करून प्रयत्न सुरू आहेत. खालापूर तालुक्यातील वासांबे मोहोपाडा येथे रसायनी एमआयडीसीमध्ये कार्यरत असणाऱ्या कंपन्यांचे कर्मचारी या ठिकाणी राहत असल्यामुळे दिडशेपेक्षा जास्त रुग्ण कोरोनाबाधित झालेले आहेत. या परिसरामध्ये कोणतेही सरकारी किंवा खासगी रुग्णालय कार्यरत नाही. यामुळे कोरोनाबाधित रुग्णांना पनवेल अथवा नवी मुंबई या ठिकाणी न्यावे लागत आहे.
बेड उपलब्ध नसल्यामुळे वासांबे मोहोपाडा हद्दीतील तिघा बाधितांना जीव गमवावा लागला आहे. वासांबे मोहोपाडा परिसरामध्ये केंद्र सरकारच्या सेबचे मोठे गृहसंकुल रिकामे असून, त्या ठिकाणी लाइट, पाणी, कॅन्टीनची योग्य व्यवस्था आहे, तसेच पिल्लई कॉलेज, रसायनी येथील जेन्ट्स व लेडिज हॉस्टेल रिकामे आहे. तरी या दोन्ही ठिकाणी किमान १०० बेडचे तात्पुरत्या स्वरूपाचे रुग्णालय चालू करावे, अशी मागणी माजी आमदार मनोहर भोईर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे, पालकमंत्री आदिती तटकरे, यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
शंभर बेडचे रुग्णालय झाल्यास येथील रुग्णांची योग्य सोय होईल. आपण या विषयाकडे तातडीने लक्ष केंद्रित करून येथील कोरोनाबाधित झालेल्या रुग्णांसाठी रुग्णालयाची उपलब्धता करून द्यावी, अशी मागणी भोईर यांनी केली आहे.