शासनाच्या मत्स्यव्यवसाय विभागाच्या गस्तीनौकेवरच फाटका, अपमान प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2023 06:04 PM2023-04-29T18:04:05+5:302023-04-29T18:04:13+5:30
उरण तालुक्यातील करंजा खाडीत शासनाच्या मत्स्यव्यवसाय विभागाची मत्स्य प्रबोधिनी ( क्रमांक आयएनडी एमएच३ एमएम -४२६६ ) ही गस्तीनौका कार्यरत आहे.
मधुकर ठाकूर
उरण : फाटका,मळका अथवा जीर्ण झालेल्या राष्ट्रध्वज लावणे हा कायद्याने गुन्हा असतानाही राज्याच्या मत्स्यव्यवसाय विभागाच्या शासकीय गस्तीनौकेवरच फाटका राष्ट्रध्वज लावण्यात आला आहे.याप्रकरणी चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची मागणी कोकण विभागीय फिशरमेन कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष मार्तंड नाखवा यांनी मुख्यमंत्री, रायगड पालकमंत्री, मत्स्यव्यवसाय मंत्री, जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारीव्दारे केली आहे.
उरण तालुक्यातील करंजा खाडीत शासनाच्या मत्स्यव्यवसाय विभागाची मत्स्य प्रबोधिनी ( क्रमांक आयएनडी एमएच३ एमएम -४२६६ ) ही गस्तीनौका कार्यरत आहे. खासगी भाडेतत्त्वावर घेतलेल्या या गस्तीनौकेवरच फाटका, मळका राष्ट्रध्वज लावण्यात आला आहे.२७ ते २८ एप्रिल दरम्यान शासनाने आयोजित केलेल्या सागरी सुरक्षा कवच या अभियानांतर्गतही ही गस्तीनौका समुद्रात गस्त घालण्यासाठी सहभागी झाली होती.
मात्र फाटका,मळका अथवा जीर्ण झालेल्या राष्ट्रध्वज लावणे हा कायद्याने गुन्हा असतानाही राज्याच्या मत्स्यव्यवसाय विभागाने या गस्तीनौकेचा वापर करून राष्ट्रध्वजाचा अपमान केला आहे. याप्रकरणी संबंधितांशी चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची मागणी कोकण विभागीय फिशरमेन कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष मार्तंड नाखवा यांनी राज्याचे मुख्यमंत्री, रायगड पालकमंत्री, मत्स्यव्यवसाय मंत्री, रायगड जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारीव्दारे केली आहे.