नवी मुंबई : वाशीतील घटस्फोटित विवाहितेला सोशल मीडियावर बदनामी करण्याची धमकी देऊन पाच लाखांची खंडणी मागितल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी वाशी पोलीसठाण्यात एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर महिलेने लग्नाला नकार दिल्याने त्याने हा प्रकार केला आहे.
वाशी सेक्टर ९ परिसरात राहणाऱ्या घटस्फोटित विवाहितेसोबत हा प्रकार घडला आहे. सदर महिला सुमारे १५ वर्षांपासून पतीपासून वेगळी मुलांसोबत राहत आहे. तीन वर्षांपूर्वी तिची इस्लामपूर येथे एका व्यक्तीसोबत ओळख झाली होती. या ओळखीचे रूपांतर प्रेम संबंधात झाल्यानंतर दोघांमध्ये अनेकदा शरीरसंबंध झाले होते. मात्र, त्यानंतर सदर व्यक्तीने त्या महिलेकडे लग्नाचा तगादा लावला होता; परंतु दोघेही विवाहित असल्याने तिने लग्नाला नकार दिला होता. यानंतर तिने त्याच्यासोबतचा संपर्क तोडला असता, काही दिवसांपासून तो पुन्हा सदर महिलेला फोन करून त्रास देत होता. या दरम्यान त्याने दोघांच्या भेटीदरम्यानचे खासगी फोटो सोशल मीडियावर टाकण्याची धमकी दिली. त्यामुळे होणारी बदनामी टाळायची असल्यास त्याने पाच लाख रुपयांची मागणी केल्याचे पीडित महिलेने तक्रारीत म्हटले आहे. त्यानुसार सदर महिलेच्या तक्रारीवरून वाशी पोलीसठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, त्या व्यक्तीविषयी महिलेला अधिक माहिती नसल्याने पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.