- लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : प्रशासनाच्या निष्काळजीमुळे घणसोलीतील बालवाडीच्या विद्यार्थ्यांची पुढील शिक्षणाची गैरसोय झाली आहे. मराठी माध्यमाची प्राथमिक शाळा नसल्याने परिसरातील बहुतांश मध्यमवर्गीय कुटुंबातील पालकांना मुलांच्या शिक्षणाची चिंता सतावत आहे. यामुळे संतप्त पालकांनी नगरसेविका कमलताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली शाळेबाहेर ठिय्या मांडला.घणसोली कॉलनी परिसरात पालिकेच्या अनुमतीने तीन बालवाड्या चालवल्या जात आहेत. या बालवाड्या सुरू करतेवेळी भविष्यात तिथल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची गैरसोय दूर करण्याच्या उद्देशाने पालिका शाळा सुरू करण्याची मागणी तत्कालीन नगरसेविका कमलताई पाटील यांनी केली होती. यानुसार २००६ सालच्या त्यांच्या ठरावानुसार घणसोली सेक्टर ७ येथे पालिकेने शाळेची इमारत उभारली आहे. परंतु गतवर्षीपासून त्याठिकाणी मराठीऐवजी हिंदी माध्यमाची शाळा सुरू केली आहे, तर मराठी माध्यमाचे केवळ माध्यमिकचे वर्ग त्याठिकाणी भरत आहेत. मात्र लगतच्या परिसरात माथाडी कामगारांची वसाहत असून त्याठिकाणी मध्यमवर्गीय मराठी कुटुंबाचे सर्वाधिक वास्तव्य आहे. त्यांच्याकरिता मराठी माध्यमाचे प्राथमिक व माध्यमिक वर्ग सुरू करण्याऐवजी पालिकेने हिंदी माध्यमाचे वर्ग सुरू केले आहेत. याचा संताप रहिवाशांकडून व्यक्त होत असतानाच बालवाडीत शिकणाऱ्या मुलांच्या प्राथमिक शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. परिसरात पालिकेची मराठी माध्यमाची प्राथमिक शाळाच नसल्याने पाल्याचे शिक्षण कुठे करायचे, असा प्रश्न पालकांना पडला आहे. तर शिक्षण मंडळ केवळ खासगी शाळांचा नफा साध्य करण्यासाठी त्याठिकाणी पालिकेचे प्राथमिक वर्ग सुरू करण्यास टाळाटाळ करत असल्याचाही पालकांचा आरोप आहे. अनेक पालकांनी यासंदर्भात शिक्षण मंडळासह लोकप्रतिनिधींकडे तक्रार केली आहे. परंतु प्रशासन दखल घेत नसल्याने संतप्त पालकांनी शुक्रवारी सकाळी पालिका शाळेबाहेर ठिय्या मांडला. पालिकेची प्राथमिक शाळा नसल्याने अनेक पालकांनी आर्थिक फटका सहन करत खासगी शाळांमध्ये पाल्यांचे प्रवेश घेतले आहेत. त्यापैकी अनेक खासगी शाळा विनापरवाना असून, प्रशासनाकडून त्याची उशिरा घोषणा झाली आहे. यामुळे चिंतीत असलेल्या पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मुलांच्या शिक्षणाची गैरसोय दूर करण्याची मागणी केली. मराठी माध्यमाचे प्राथमिक शाळेचे वर्ग सुरू करा, अन्यथा मुलांच्या शिक्षणाच्या होणाऱ्या गैरसोयीला प्रशासन जबाबदार असेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. अखेर शिक्षण अधिकारी संदीप संगवी यांनी संपर्क साधून येत्या महासभेत यासंबंधीचा प्रस्ताव पटलावर घेतला जाईल, असे आश्वासन दिल्याचे नगरसेविका कमल पाटील यांनी सांगितले.
पालिकेच्या प्राथमिक शाळेची मागणी
By admin | Published: June 17, 2017 2:11 AM