पनवेल : पनवेल नगरपालिकेच्या मालकीची जुनी इमारत जमीनदोस्त करून त्या जागी नवीन इमारत उभारण्यात येणार आहे. त्यामुळे दीडशे वर्षांची परंपरा असलेल्या पनवेल नगरपालिकेची इमारत रिकामी करण्यात आली आहे. इमारतीच्या पाडकामास सुरुवात झाली आहे. ब्रिटिशकाळापासून नगरपालिकेचा कारभार या इमारतीत सुरू होता. या कौलारू वास्तूत आरोग्य, पथप्रकाश, भांडार, रेकॉर्ड रूम व पाणीपट्टी वसुली हे विभाग सुरू होते, मात्र आता ही वास्तू दुरुस्तीच्या पलिकडे गेल्यामुळे जमिनदोस्त करण्यात येत आहे. पालिकेचा वाढलेला ताण, अपुऱ्या जागेमुळे ही इमारत जमीनदोस्त करून त्या जागी नवीन इमारत उभारण्याचा प्रस्ताव पालिकेने ठेवला. त्या ठरावाला मंजुरी सुध्दा मिळाली. त्यानुसार जुनी इमारत तोडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे पथप्रकाश भंडार व रेकॉर्ड रूम मुख्याधिकारी निवासस्थानी हलविण्यात आले आहे. हे निवासस्थान गेल्या दोन वर्षांपासून रिकामे होते. मुख्याधिकारी दुसऱ्या ठिकाणी रहात असल्याने ही वास्तू धूळखात पडून होती. नगरपालिकेचे काही विभाग याठिकाणी स्थलांतरित करण्यात आल्याने इमारतीची डागडुजी त्याचबरोबर साफसफाई करण्यात आली आहे.
पालिकेची इमारत पाडणार
By admin | Published: August 05, 2015 12:15 AM