स्पॅगेटी प्रकल्पातील इमारतीला तडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2020 10:55 PM2020-02-10T22:55:13+5:302020-02-10T22:55:27+5:30

कामाच्या दर्जाबाबत शंका : स्ट्रक्चरल आॅडिट करण्याची रहिवाशांची मागणी

Demolish the building in the spaghetti project | स्पॅगेटी प्रकल्पातील इमारतीला तडे

स्पॅगेटी प्रकल्पातील इमारतीला तडे

Next

वैभव गायकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
पनवेल : सिडकोने उभारणी केलेल्या खारघर सेक्टर १५ मधील स्पॅगेटी हौसिंग सोसायटीच्या पिलरला तडे गेल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. शुक्रवारी के ४ बिल्डिंगच्या पाचव्या मजल्यावरील सज्जा अचानक कोसळला. सुदैवाने घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. या सदनिकांचा ताबा घेऊन पंधरा वर्षे झाले आहेत. मात्र या काळात इमारतींना अनेक समस्यांनी वेढले आहे. त्यामुळे रहिवासी चिंतेत आहेत.


२००५ मध्ये रहिवाशांनी स्पॅगेटीतील गृहप्रकल्पाचा ताबा घेतला. या ठिकाणी गृहप्रकल्पात जे, के, एल, एम अशा चार विंग आहेत. चार विंगमध्ये एकूण १८ इमारती असून एकूण ४५६ सदनिका आहेत. सध्याच्या घडीला हजारो रहिवासी या ठिकाणी वास्तव्यास आहेत. मात्र एवढ्या कमी वेळात इमारतींच्या पिलरला तडे गेल्याने रहिवासी कामाच्या दर्जाबाबत संभ्रमात आहेत.


सिडकोने गृहप्रकल्प उभारताना रहिवाशांना विविध आश्वासने दिली होती. त्यामध्ये कामाचा दर्जा ही महत्त्वाची बाब होती. मात्र इमारतींच्या पिलरला ठिकठिकाणी तडे गेल्याने २०१२ मध्ये स्पॅगेटी को-आॅपरेटिव्ह हौसिंग सोसायटीमार्फत सिडकोसोबत पत्रव्यवहार केले होते. या वेळी सिडकोने स्ट्रकवेल डिझायनर अँड कन्सल्टंट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला तात्पुरत्या स्वरूपात तडे बुजविण्याचे काम दिले होते. हे काम पूर्ण झाल्यावर अवघ्या सात वर्षांत पुन्हा एकदा स्पॅगेटी सोसायटीतील इमारतींच्या पिलरला तडे गेल्याने रहिवाशांनी सोमवारी सिडकोच्या मुख्य दक्षता अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार करून दखल घेण्याची विनंती केली आहे.


गृहप्रकल्पाच्या स्ट्रक्चरल आॅडिटची मागणी सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी केली असून यापूर्वीही रहिवाशांनी ही मागणी केली होती. मात्र सिडकोकडून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप स्पॅगेटी सोसायटीचे सचिव यशवंत देशपांडे यांनी केला.


सिडकोच्या निकृष्ट बांधकामाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
सिडकोच्या माध्यमातून नवी मुंबई शहराची उभारणी करण्यात आली. वसाहती उभारण्यात आल्या. परंतु सिडकोच्या माध्यमातून बांधलेल्या इमारती अल्पावधीतच निकृष्ट ठरल्या. अवघ्या पंधरा-वीस वर्षांत या इमारतींची पडझड सुरू झाली. अनेक इमारतींच्या भिंतींना तडे गेले आहेत. प्लास्टर निखळण्याच्या घटना नेहमीच्याच झाल्या आहेत.
ऐरोली, घणसोली, वाशी, नेरूळ, सीबीडी, कळंबोली, नवीन पनवेल आदी भागांतील सिडकोनिर्मित इमारतींची दुरवस्था झाली आहे. या इमारतींच्या पुनर्बांधणीचा प्रश्न मागील अनेक वर्षे चर्चिला जात आहे. पूर्वीच्या बांधकामाच्या दर्जाबाबत ओरड असतानाही सिडकोने त्यानंतर उभारलेल्या बांधकाम प्रकल्पांचा दर्जा सुधारला नाही.
२००५ मध्ये म्हणजेच पंधरा वर्षांपूर्वी खारघर येथे उभारलेल्या स्पॅगेटी गृहप्रकल्पातील इमारतीलासुद्धा तडे गेल्याचे समोर आले आहे. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सिडकोने येत्या काळात जवळपास दोन लाख घरांच्या निर्मितीचे उद्दिष्ठ ठेवले आहे. या प्रस्तावित गृहप्रकल्पांच्या उभारणीत तरी सिडकोने बांधकामांचा दर्जा राखावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Web Title: Demolish the building in the spaghetti project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :cidcoसिडको