नवी मुंबई : राष्ट्रवादीला रामराम ठोकत माजी मंत्री गणेश नाईक यांनी अखेर बुधवारी भाजपत जाहीर प्रवेश केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या या भव्य कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन केले. या कार्यक्रमाला नवी मुंबईसह ठाणे, रायगडमधील त्यांचे हजारो समर्थक उपस्थित होते.
गणेश नाईक यांचे पुत्र संदीप नाईक यांनी गेल्या महिन्यात आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपत प्रवेश केला. तेव्हापासून गणेश नाईक यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रातील केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत भव्य कार्यक्रमाच्या माध्यमातून नाईक भाजप प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. त्यानुसार ९ सप्टेंबरचा मुहूर्त ठरला होता. परंतु मुख्यमंत्री व्यस्त असल्याने या कार्यक्रमासाठी ९ सप्टेंबरची तारीख मिळाली नाही. त्यामुळे हा मुहूर्त टळला. अखेर मुख्यमंत्र्यांनी दोन दिवसापूर्वी ११ सप्टेंबरची वेळ दिली. या प्रवेश सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात मोठ्या प्रमाणात वातावरणनिर्मिती करण्यात आली होती. शहरातील मुख्य चौकासह प्रमुख रस्त्यांवर नाईक यांच्या भाजप प्रवेशाचे फलक लावण्यात आले होते. त्यानुसार बुधवारी वाशी येथील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये हा प्रवेश सोहळा पार पडला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून नाईक यांनी मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन केले. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे ४८ नगरसेवक सुद्धा भाजपात दाखल झाले. त्यामुळे पुढील काही दिवसांत राष्ट्रवादीच्या ताब्यातील एकमेव नवी मुंबई महापालिकेवर सुद्धा कमळ फुलणार हे निश्चित झाले आहे.
दरम्यान, नवी मुंबईतील प्रश्नांसाठी आमदार मंदा म्हात्रे व संदीप नाईक यांचा सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. त्यापैकी अनेक प्रश्न मार्गी लागले. मात्र काही तांत्रिक बाबीमुळे रखडले आहेत. आता नाईक यांच्या सहयोगाने हे प्रश्न सुद्धा सोडविले जातील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वेळी दिली. नाईक यांनी आपल्या भाषणातून भाजप नेतृत्वावर स्तुस्तीसुमने उधळली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाच्या अजेंड्यामुळे भारताचा जगाच्या पाठीवर दबदबा निर्माण होत आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकासाभिमुख कार्यामुळे राज्यात विकासाचा आलेख उंचावत असल्याचे प्रतिपादन गणेश नाईक यांनी केले. नाईक यांच्यामुळे जिल्ह्यात भाजपला अधिक बळकटी प्राप्त होईल, असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी आपल्या भाषणातून नाईक यांच्या कार्याचे कौतुक केले. यावेळी मंदा म्हात्रे यांनी पूरग्रस्तांसाठी धनादेश मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला.प्रवेशाविषयी उत्सुकतामाजी मंत्री गणेश नाईक ठाणे जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे महत्त्वाचे पदाधिकारी घेऊन भाजपत प्रवेश करतील असे बोलले जात होते. यामुळे नवी मुंबईमधील नगरसेवकांव्यतिरिक्त ठाणे व रायगडमधून नक्की कोण प्रवेश करणार याविषयी उत्सुकता निर्माण झाली होती. पण नवी मुंबईमधील ४८ नगरसेवक वगळता शहराबाहेरील कोणत्याही महत्त्वाच्या पदाधिकाºयाने प्रवेश केला नाही.सकाळी सहापासून बंदोबस्तवाशीमध्ये नाईक परिवाराच्या भाजप पक्षप्रवेशामुळे सिडको प्रदर्शनी केंद्रामध्ये व परिसरामध्ये पहाटे सहा वाजल्यापासून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सायंकाळी सहा वाजता प्रवेशाचा कार्यक्रम होणार होता. पण १२ तास अगोदर बंदोबस्त ठेवल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात होते. कार्यक्रमस्थळी येणाºया सर्वांवर लक्ष ठेवण्यात येत होते. सभागृहात छत्री व इतर वस्तू घेऊन जाण्यासही मज्जाव केला होता.
परिसराची साफसफाईपक्षप्रवेशाच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री येणार असल्यामुळे महानगरपालिकेने संपूर्ण परिसराची स्वच्छता केली होती. रोडवरील खड्डे डांबर व खडी टाकून बुजविण्यात आले. पदपथ दुरुस्तीसह इतर कामेही करण्यात आली होती. कुठेही कचरा किंवा इतर गैरसोयी राहणार नाहीत याची काळजी घेतली जात होती.