महाविकास आघाडीच्या विरोधात निदर्शन; पनवेलमध्ये भाजपचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2020 10:48 PM2020-02-25T22:48:46+5:302020-02-25T22:49:03+5:30

तहसील कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी

Demonstrated opposition to the development front; BJP's agitation in Panvel | महाविकास आघाडीच्या विरोधात निदर्शन; पनवेलमध्ये भाजपचे आंदोलन

महाविकास आघाडीच्या विरोधात निदर्शन; पनवेलमध्ये भाजपचे आंदोलन

Next

पनवेल : शेतकरी व सर्वसामान्य जनतेला दिलेली आश्वासनांची पूर्तता करण्यात अपयशी ठरल्याचा आरोप करीत भाजपने महाविकास आघाडीच्या विरोधात राज्यभर निदर्शने केली. त्यानुसार भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल तहसील कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली.

सातबारा कोरा करा, शेतकऱ्यांनाा न्याय मिळाला पाहिजे, महिलांवरील अत्याचार थांबले पाहिजेत, कर्नाळा बँकेकडून ठेवीदारांना पैसे मिळालेच पाहिजेत आदी मागण्यांच्या घोषणा देत भाजपने महाविकास आघाडीच्या विरोधात निदर्शने केली. सकाळी १० वाजता सुरू झालेले हे धरणे आंदोलन दुपारी ३ वाजता मागे घेण्यात आले. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. जनादेशाचा अपमान करून सत्तेवर आलेल्या शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडी सरकारने घोषणांची पूर्तता न करता शेतकऱ्यांची घोर फसवणूक केली आहे. त्याचबरोबर या सरकारच्या बेफिकिरीमुळे राज्यात महिलांवरील अत्याचार वाढले आहेत. दिवसेंदिवस ढासळती कायदा सुव्यवस्था याकडे तसेच आर्थिक गैरव्यवहाराबाबत आघाडी सरकार फक्त बघ्याचीच भूमिका घेत आहे. आघाडी सरकारमध्ये निर्णयक्षमता नसल्याने ठोस उपाययोजना होत नाही, त्यामुळे सर्वसामान्य जनता पुरती कंटाळली आहे, असा आरोप या वेळी निदर्शनकर्त्यांकडून करण्यात आला. सरकार स्थापन करीत असताना शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी आणि आताच्या मुख्यमंत्र्यांनी तसेच काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी शेतकºयांना बांधावर जाऊन अवकाळीग्रस्तांना प्रतिहेक्टर २५ हजार रुपये आणि फळबागांसाठी प्रतिहेक्टर ५० हजार रुपये मदत देण्याची घोषणा केली होती; पण महाविकास आघाडी सरकारच्या प्रमुखांना आपल्या आश्वासनाचा विसर पडला आहे. ‘सरसकट कर्जमाफी करू’, ‘सातबारा कोरा करू’ अशा घोषणा हवेत विरल्या आहेत. महाआघाडी सरकारची कर्जमाफी योजना सरसकट फसवणूक करणारी आहे.

भाजप सरकारच्या व्यापक कर्जमाफीमुळे ४३ लाख खातेधारकांना १९ हजार कोटींचा लाभ देण्यात आला होता. मात्र, महाविकास आघाडी सरकारने फक्त घोषणा केली. त्याची अंमलबजावणी केली नाही. सरकार स्थापनेच्या लालसेपोटी महाविकास आघाडी सरकारने शेतकºयांची घोर फसवणूक केली असल्याचा आरोप आमदार प्रशांत ठाकूर यांनी या वेळी केला.

या आंदोलनात कोकण म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील, महापौर डॉ. कविता चौतमोल, भाजपचे तालुकाध्यक्ष अरुण भगत, शहराध्यक्ष जयंत पगडे, सभागृहनेते परेश ठाकूर, जिल्हा उपाध्यक्ष सुनील घरत, राजेंद्र पाटील, जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, ज्येष्ठ नेते सी. सी. भगत, माजी उपमहापौर चारुशीला घरत, विक्रांत पाटील, जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, कामोठे अध्यक्ष रवींद्र जोशी, खारघर अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Web Title: Demonstrated opposition to the development front; BJP's agitation in Panvel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :BJPभाजपा