विमानतळबाधित ग्रामस्थांची निदर्शने; टाटा पॉवरचे काम पाडले बंद; शेकडोंचा सहभाग
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2020 11:52 PM2020-02-04T23:52:13+5:302020-02-04T23:53:13+5:30
पॅकेजच्या अंमलबजावणीविरोधात संताप
पनवेल : वाघिवली ग्रामस्थांनी मंगळवारी टाटा हाय पॉवरचे काम बंद पाडले. नवी मुंबईविमानतळग्रस्तांना दिलेल्या शासनाच्या पॅकेजची योग्य पद्धतीने अंमलबजावणी करण्यासाठी ही निदर्शने करण्यात आली. या वेळी शेकडोच्या संख्येने ग्रामस्थ रस्त्यावर उतरले होते.
अखिल भारतीय किसान सभेचे रायगड जिल्हाध्यक्ष रामचंद्र म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला होता.
वाघिवली गावातील मच्छीमारांना योग्य पॅकेज द्या, तसेच घरांच्या मोबदल्यात तीनपट जागा देण्याची मागणी येथील ग्रामस्थांनी शासनाकडे केली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही भेट घेतली असून, मुख्यमंत्र्यांनी संबंधित प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले असून त्यासाठी थोडा वेळ द्या, असेही ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाला सांगितले आहे. मात्र, अद्याप मागण्या मान्य केल्या नसल्याने रस्त्यावर उतरून निदर्शन करीत असल्याचे म्हात्रे यांनी स्पष्ट केले.
विशेष म्हणजे, वाघिवली गावात अद्यापही ग्रामस्थांचे वास्तव्य आहे, असे असताना सिडकोकडून भराव करण्यात आल्याने वहिवाटीचा रस्ता बंद झाला आहे, त्यामुळे ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. एनआरआय पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या विभागातील ग्रामस्थांच्या निषेधाची माहिती मिळताच आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. वाघिवली गावातील ३० ते ३५ गावांमध्ये अद्यापही ग्रामस्थांचे वास्तव्य असल्याने सिडको प्रशासन जाणून बुजून त्रास देत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
सिडकोच्या माध्यमातून मागण्या मान्य न झाल्यास भविष्यातील आंदोलन अधिक आक्रमक असेल, असा इशारा अखिल भारतीय किसान सभेचे रायगड जिल्हाध्यक्ष रामचंद्र म्हात्रे यांनी स्पष्ट केले.
पोलीस ठाण्यात डांबल्याचा आरोप
विमानतळ बाधितांसाठी जाहीर केलेल्या पॅकेजची योग्य प्रकारे अंमलबजावणी न केल्याने वाघिवलीतील संतप्त ग्रामस्थांनी आंदोलन केले.
च्या वेळी आंदोलनकर्त्यांवर एनआरआय पोलिसांनी लाठीचार्ज केला. यामध्ये मोठ्या संख्येने महिला जखमी झाल्या आहेत. त्यानंतर सायंकाळी उशिरापर्यंत मोठ्या संख्येने ग्रामस्थ महिलांसह पुरुषांना पोलीस ठाण्यात डांबून ठेवल्याचा आरोप आगरी, कोळी, कराडी प्रकल्पग्रस्त संस्थेचे गौरव म्हात्रे यांनी केला.घटनेची माहिती मिळताच विविध गावांतील प्रकल्पग्रस्तांनी एनआरआय पोलीस ठाण्यात धाव घेतली. या वेळी पोलीस ठाण्याला छावणीचे स्वरूप आले होते.
प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या
1 प्रकल्पग्रस्तांना विमानतळामध्ये नोकºया देण्यात याव्यात
2 स्थलांतरित गावातील मच्छीमारांचे पुनर्वसन
3 शून्य पात्रता मंजूर करणे
4 घरांचे योग्य भाडे देण्यात यावे
5 बांधकाम खर्चाची रक्कम वाढविणे