महापालिकेकडून रासायनिक अपघाताचे प्रात्यक्षिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2019 01:16 AM2019-02-01T01:16:10+5:302019-02-01T01:16:50+5:30
आपत्तीप्रसंगी मदतीसाठी यंत्रणा सज्ज असल्याचा अनुभव
नवी मुंबई : एखादा आपत्तीचा प्रसंग ओढवल्यास त्या ठिकाणी त्वरित मदतकार्य उपलब्ध व्हावे, यादृष्टीने संबंधित प्राधिकरणांच्या कृतिशीलतेची पाहणी करण्यासाठी नवी मुंबई महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत रासायनिक अपघात प्रसंगी तातडीने करावयाच्या उपाययोजनांबाबत उरण फाटा नेरुळ येथे प्रात्यक्षिक (मॉकड्रिल) करण्यात आले. शहरात असा आपत्तीचा प्रसंगी ओढवल्यास मदतकार्यासाठी यंत्रणा सज्ज असल्याचा अनुभव या वेळी आला.
सायन-पनवेल महामार्गावर उरणकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला उरण फाटा येथे प्रात्यक्षिक करण्यात आले. एन.एम.एम.टी.ची बस व रासायनिक टँकरचा अपघात झाल्याची खबर उरण फाट्यावर कर्तव्य बजावित असलेल्या वाहतूक पोलिसाने पोलीस नियंत्रण कक्षास कळविल्यानंतर पोलीस नियंत्रण कक्षातून बेलापूर अग्निशमन केंद्र व बेलापूर पोलीस ठाणे यांना घटनेची खबर देण्यात आली. प्रत्यक्ष घटनास्थळी पोलीस व वाहतूक पोलीस विभागाने पुढाकार घेत घटनास्थळी उपस्थित नागरिकांना सुरक्षित अंतरावर ठेवण्याबाबत कार्यवाही केली व वाहतूक सुरळीत व्हावी, या दृष्टीने दुसºया मार्गाने वाहतूक वळविण्याबाबत कार्यवाही सुरू केली. अग्निशमन विभागामार्फत बसमधील डमी दुर्घटनाग्रस्तांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे काम करण्यात आले, तसेच आरोग्य विभागामार्फत घटनास्थळी पोहोचलेल्या रुग्णवाहिकांमधून महानगरपालिकेच्या वाशी व नेरु ळ रुग्णालय तसेच नजीकचे अपोलो हॉस्पिटल व डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालय या ठिकाणी अपघातग्रस्त डमी रुग्णांना रुग्णवाहिकेतून स्थलांतरित करण्यात आले. एन.डी.आर.एफ. जवानांनी व एस.आय. समूहाच्या हॅझमॅट यंत्रणेने अमोनिया गॅसची गळती रोखण्याची कार्यवाही केली. गॅसचा टॅँकर अमोनिया गॅसचा असल्याची माहिती मिळाल्याने डीशमार्फत रसायनतज्ज्ञ घटनास्थळी उपस्थित होते. सदर प्रात्यक्षिक सुरू असलेल्या ठिकाणी महापौर जयवंत सुतार व सभागृह नेते रवींद्र इथापे यांनी पाहणी केली. आयुक्त रामास्वामी एन. यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रात्यक्षिकांचे आयोजन महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने अतिरिक्त आयुक्त (शहर) रवींद्र पाटील यांच्या नियंत्रणाखाली केले होते.