राष्ट्रवादी काँग्रेसची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2019 11:17 PM2019-09-26T23:17:05+5:302019-09-26T23:17:19+5:30

कार्यकर्त्यांची सरकारविरोधात घोषणाबाजी

Demonstrations of NCP | राष्ट्रवादी काँग्रेसची निदर्शने

राष्ट्रवादी काँग्रेसची निदर्शने

Next

नवी मुंबई : बँक घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर ईडीने गुन्हा दाखल केल्याने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संताप व्यक्त करीत असून, नवी मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी गुरुवारी वाशीतील शिवाजी चौकात निदर्शने केली. या वेळी सरकारविरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली.

बँक घोटाळाप्रकरणी शरद पवार, अजित पवार यांच्यासह ७0जणांवर ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर गुन्हा दाखल झाल्याने सरकार सूडबुद्धीने राजकारण करीत असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. या वेळी नवी मुंबई राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अशोक गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली वाशीत सरकारच्या निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी गावडे यांनी राज्यात सरकारची चुकीच्या दिशेने पावले पडत असून काही दिवसांपूर्वी काही लोकांनी पक्षांतर करून राष्ट्रवादी पक्षाला अडचणीत आणण्याचे काम केल्याचा आरोप केला. गेल्या २५ वर्षांपासून शिखर बँकेच्या चौकशीत शरद पवार यांचे नाव नव्हते याबाबत भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी स्पष्टीकरण देखील दिले असताना हेतूपुरस्सरपणे पवारांचे नाव जोडले जात असल्याचे ते म्हणाले.

सरकारची हुकूमशाही सुरू असून याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असा इशारा त्यांनी दिला. या वेळी नवी मुंबई राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष जी.एस.पाटील, प्रदेश सरचिटणीस भालचंद्र नलावडे, अफसर इमाम, युवक अध्यक्ष राजेश भोर, रंगनाथ प्रभू, अशोक सूर्यवंशी, नवी मुंबई महिला अध्यक्षा रोहिणी घाडगे, नगरसेविका सपना गावडे, तालुका अध्यक्ष महादेव पवार आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उरणमध्येही निदर्शने
उरण : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर राजकीय सूडबुद्धीने गुन्हा दाखल केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँगे्रसच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. कार्यकर्त्यांनी उरणमधील गांधी चौकात सत्ताधारी व ईडीविरोधात जोरदार घोषणाबाजी देत निषेध केला. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष प्रशांत पाटील, भावना घाणेकर, पुखराज सुतार, मनोज भगत आदी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Demonstrations of NCP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.