पनवेलमध्ये आढळले डेंग्यूचे रुग्ण?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 02:37 AM2018-07-21T02:37:38+5:302018-07-21T02:37:40+5:30
पनवेल महापालिका क्षेत्रातील परदेशी आळीमध्ये डेंग्यूचा रुग्ण आढळल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली आहे.
पनवेल : पनवेल महापालिका क्षेत्रातील परदेशी आळीमध्ये डेंग्यूचा रुग्ण आढळल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली आहे. महापालिकेने शहरात सक्षम यंत्रणा राबविण्याची मागणी पालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी केली आहे.
पनवेल शहरात डेंग्यूचे सात रु ग्ण आढळल्याची चर्चा आहे. नुकतेच परदेशी आळीमध्ये डेंग्यूचा रुग्ण आढळला असून, त्या रुग्णाला शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या संदर्भात शेकापने आक्र मक भूमिका घेत डेंग्यू निवारणासंदर्भात विशेष उपाययोजना राबविण्याची मागणी केली आहे. शुक्रवारी शेकाप नगरसेविका डॉ. सुरेखा मोहोकर, नगरसेविका प्रीती जॉर्ज, माजी नगरसेवक डी. पी. म्हात्रे, रोहण गावंड या कार्यकर्त्यांनी पालिका आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांना सोबत घेऊन परदेशी आळीमध्ये स्वत: धुरीकरण तसेच फवारणी केली.
शहरातील डेंग्यूच्या साथीला नियंत्रणात आणण्यासाठी विशेष पथक नेमण्याची मागणी आयुक्तांकडे केली आहे. या पथकात आरोग्य विभागाचे अधिकारी, डॉक्टर्स, पालिकेचे कर्मचारी आदीचा समावेश असावा. पथकाच्या कामकाजावर उपायुक्त अथवा आयुक्तांचे नियंत्रण असावे, अशी मागणी म्हात्रे यांनी केली आहे.
पनवेल शहरात गढूळ पाणीपुरवठा होत असल्याने रहिवाशांमध्ये घबराट पसरली आहे. या बाबतही पालिकेने योग्य उपाययोजना राबविण्याची आवश्यकता आहे.
>सापडलेले रु ग्ण हे डेंग्यू संशयित आहेत. डेंग्यू तसेच साथीचे आजार निवारणासाठी सर्वच प्रकारच्या उपाययोजना राबविल्या आहेत. शनिवार, २१ जुलैपासून जवळ जवळ ४०० सोसायट्यांना नोटीस पाठवून घरात किंवा परिसरात उघड्यावर पाणी साठवून ठेवू नये, अशी विनंती करणार आहोत. शहरात उघड्यावर ठेवलेले टायर्स तसेच पाणी साचणाऱ्या विविध वस्तू जप्त करण्यासाठी देखील मोहीम हाती घेतली जाणार आहे.
- संजय जाधव,
स्वच्छता निरीक्षक, पनवेल महापालिका