महाड : महाड तालुक्यातील निगडे फणसेकोंड येथे गेल्या आठ दिवसांपासून सुरू झालेल्या डेंग्यूचा फैलाव सुरूच आहे. डेंग्यूसदृश तापाची लागण झालेल्या सर्व रुग्णांच्या नातेवाईकांनी या रुग्णांना मुंबईतील जे. जे. रुग्णालयात उपचार घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर शुक्रवारी सकाळी गावातील सर्व रुग्णांना जे. जे. रुग्णालयात उपचारार्थ हलवण्यात आले आहे.डेंग्यूच्या भीतीने फणसेकोंड येथील ग्रामस्थांनी तालुक्यातील नातेवाईकांकडे स्थलांतर केले. सध्या गावात केवळ वीस ते पंचवीस वयोवृद्ध मंडळीच राहत असल्याची माहिती ग्रामस्थ नारायण फणसे यांनी दिली. इतक्या मोठ्या प्रमाणावर डेंग्यूची लागण होवून आठ दिवस झाले तरी महाडच्या प्रांताधिकारी सुषमा सातपुते आणि तहसीलदार संदीप कदम यांनी गावाला भेटही दिलेली नाही. बिरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बिरादार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आपली यंत्रणा चोखपणे राबवली. गावात जंतूनाशक फवारणी तसेच धुरीकरण करून डेंग्यूचा फैलाव रोखण्यास उपाययोजना केल्या. ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी यंत्रणा नसल्याने तसेच वैद्यकीय अधीक्षक रजेवर असल्याने रुग्णांकडे दुर्लक्ष होवू नये म्हणून सर्व रुग्णांना मुंबईतील जे.जे. रुग्णालयात हलविण्यात आल्याचे नारायण फणसे यांनी स्पष्ट केले.
डेंग्यूचे रुग्ण जे.जे. रुग्णालयात
By admin | Published: May 14, 2016 12:58 AM