सुकापूरमध्ये डेंग्यूचा रुग्ण दगावला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2019 01:17 AM2019-11-30T01:17:53+5:302019-11-30T01:18:14+5:30

सुकापूर येथे राहणाऱ्या रिंकू कुमार (१९) या तरुणाचा डेंग्यूने मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी रात्री उघडकीस आली. गेल्या काही दिवसांपासून रिंकू आजारी होता.

Dengue patient stricken in Sukapur | सुकापूरमध्ये डेंग्यूचा रुग्ण दगावला

सुकापूरमध्ये डेंग्यूचा रुग्ण दगावला

Next

- वैभव गायकर
पनवेल : सुकापूर येथे राहणाऱ्या रिंकू कुमार (१९) या तरुणाचा डेंग्यूने मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी रात्री उघडकीस आली. गेल्या काही दिवसांपासून रिंकू आजारी होता. नवीन पनवेलमधील एका खासगी क्लिनिकमध्ये तो उपचार घेत होता. मात्र, प्रकृती खालावल्याने त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या ठिकाणी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

पनवेल महानगरात याआधी डेंग्यूमुळे दोन रुग्ण दगावल्याच्या घटना घडल्या आहेत. यात कामोठे व कळंबोलीतील रुग्णांचा समावेश होता. पनवेल महापालिका क्षेत्रात डेंग्यूच्या संशयित रुग्णांची संख्या वाढली असून, सध्याच्या घडीला ५४ च्या घरात ही संख्या पोहोचली आहे.

पंचायत समिती क्षेत्रातही डेंग्यू, मलेरिया यांसारख्या साथीच्या आजारांची संख्या मोठी आहे. डेंग्यूच्या अळ्या या स्वच्छ पाण्यात आढळत असल्याने नागरिकांनी आपले घर व परिसर स्वच्छ ठेवण्याची गरज असल्याचे मत पालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. सचिन जाधव यांनी व्यक्त केले आहे. सुकापूर येथे डेंग्यूचा रुग्ण दगावल्यानंतर संबंधित रुग्णाची माहिती नेरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला दिली असल्याचे जाधव यांनी सांगितले.

जिल्हा मलेरिया अधिकाऱ्यांच्या टीमसह पालिकेचे पथक सर्व्हे करत आहे. स्वच्छ पाण्यात डेंग्यूच्या अळ्या आढळत असल्याने नागरिकांनी आपल्या घरातील फुलदाण्या, भांडी, फ्रिज, भरलेल्या पिंपातील पाणी नियमित बदलणे गरजेचे असल्याचे जाधव यांनी सांगितले. पालिकेमार्फ त जिल्हा उपजिल्हा रुग्णालयात डेंग्यूच्या आजारावर उपचारासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. खासगी रुग्णालयांनाही डेंग्यूच्या रुग्णांची माहिती देण्यासंदर्भात पत्रव्यवहार केल्याचे पालिकेच्या मार्फ त सांगण्यात आले.

पालिका क्षेत्रात खारघर, कळंबोली, कामोठे, तळोजे, पनवेल शहर, नवीन पनवेल आदी नोडचा समावेश आहे. हे क्षेत्र वगळल्यास करंजाडे तसेच पंचायत समितीचा मोठा भाग पनवेल तालुक्यात मोडतो. या विभागातही डेंग्यू, मलेरियासारख्या साथीच्या आजारांनी थैमान घातला आहे. यासंदर्भात नागरिकांनीही सतर्क राहणे गरजेचे आहे.

महापालिका क्षेत्रात १५ डेंग्यूचे रुग्ण, तर ५४ संशयित
पनवेल महानगरपालिका क्षेत्रात यापर्वी दोन डेंग्यूचे रुग्ण दगावल्याची घटना घडली आहे. यामध्ये कामोठे व कळंबोली येथील रुग्णांचा समावेश होता. पनवेल महानगरपालिका क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या मोठी आहे. सध्याच्या घडीला पालिका क्षेत्रात १५ डेंग्यूच्या रुग्णांची संख्या आहे, तर संशयित रुग्णाची संख्या ५४ च्या घरात पोहोचली आहे.

डेंग्यूबाबत केवळ प्रशासनावर अवलंबून न राहता आपली काळजी स्वत: घेणे गरजेचे आहे. डेंग्यूचा अळ्या स्वच्छ पाण्यात निर्माण होत असल्याने फुलदाण्या, टायर, चायनीज बांबू यामध्ये जास्त वेळ पाणी साचून राहणार नाही. याबाबत खबरदारी घेणे गरजेचे आहे.
- डॉ. अरुणकुमार भगत,
नगरसेवक, माजी सभापती आरोग्य समिती, पनवेल महानगरपालिका

मलेरिया, डेंग्यू या साथीच्या आजारांच्या निवारणासाठी जनजागृती करीत आहोत. सोसायट्यांमध्ये पोस्टर, घरोघरी सूचना देण्यासंदर्भात मोहीम हाती घेतली आहे, नागरिकांनीही डेंग्यूसारख्या साथीच्या आजाराची लागण होऊ नये म्हणून दक्षता घ्यावी.
- डॉ. सचिन जाधव,
आरोग्य अधिकारी,
पनवेल महापालिका

Web Title: Dengue patient stricken in Sukapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.