खुल्या टाक्यांमुळे डेंग्यूचा फैलाव
By admin | Published: November 10, 2015 01:24 AM2015-11-10T01:24:43+5:302015-11-10T01:24:43+5:30
शहरात जुलैपासून तापाच्या रूग्णांमध्ये वाढ होवू लागली आहे. डेंग्यू व मलेरियाच्या संशयित रूग्णांची संख्याही वाढली आहे.
नवी मुंबई : शहरात जुलैपासून तापाच्या रूग्णांमध्ये वाढ होवू लागली आहे. डेंग्यू व मलेरियाच्या संशयित रूग्णांची संख्याही वाढली आहे. इमारतींवरील पाण्याच्या उघड्या टाक्या, भंगार साहित्य व इतर ठिकाणी पाणी साचल्याने डासांची उत्पत्ती होत असल्याचे निदर्शनास आले आहे. नागरिक स्वत: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करत असून त्याचे खापर आरोग्य विभाग व नगरसेवकांवर फोडले जात आहे.
नवी मुंबईमध्ये आरोग्य यंत्रणा कोलमडली आहे. पालिकेची माता बाल रूग्णालये बंद होवू लागली आहेत. नागरी आरोग्य केंद्रामधून प्रभावीपणे काम होत नाही. पूर्ण भार वाशीतील प्रथम संदर्भ रूग्णालयावर पडू लागला आहे. योग्य उपचार मिळत नसल्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. जुलै महिन्यापासून शहरात तापाची साथ सुरू झाली असून डेंग्यू व मलेरियाच्या संशयित रूग्णांची संख्याही वाढली आहे. बंद रूग्णालय, फसलेला सुपरस्पेशॅलिटीचा प्रयोग व नवीन रूग्णालय सुरू होण्यास लागणारा विलंब याचा सर्व राग नागरिक व लोकप्रतिनिधींनी डेंग्यू व मलेरिया नियंत्रण विभागावर काढण्यास सुरवात केली आहे.
आरोग्य विभागाने डेंग्यू व मलेरियाचा फैलाव होवू नये यासाठी व्यापक जनजागृती सुरू केली आहे. पथनाट्य, आरोग्य शिबिर, माहितीपत्रकांच्या माध्यमातूनही जनजागृती सुरू आहे. नागरिकांनी घर व परिसर स्वच्छ ठेवावा, पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. टेरेसवर भंगार साहित्य व इतर वस्तू ठेवू नये याविषयी आवाहन करूनही नागरिक याकडे दुर्लक्ष करत आहेत.
शहरामधील ७० टक्के इमारतींवरील पाणी साठविण्याच्या टाक्यांवर झाकणच नसते. झाकण नसल्यामुळे पाण्यामध्ये डासांची उत्पत्ती होवू लागली आहे. अनेक इमारतींवर असलेल्या साहित्यामध्येही पाणी साचत आहे. अनेक नागरिकांच्या घरामध्ये असणाऱ्या साठवण टाक्याही वेळोवेळी साफ केल्या जात नाहीत. याविषयी मनपा जनजागृती करत असूनही नागरिक योग्य काळजी घेत नाहीत. नागरिकांनी योग्य खबरदारी घेतली नाही तर महापालिकेने कितीही काळजी घेतली तरी साथ आटोक्यात येवू शकत नाही. वाशीमधील शिवसेना नगरसेवक किशोर पाटकर यांनीही आरोग्याच्या विशेष सर्वसाधारण सभेमध्ये या समस्येकडे लक्ष वेधले होते. पाण्याच्या टाक्या उघड्या असल्यामुळे मोठ्या प्रमाणात डासांचा फैलाव होत आहे. नागरिकांनी टाक्या बंदिस्त कराव्या व जे करणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करावी असे मत व्यक्त केले होते. (प्रतिनिधी)