लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : तीव्र पाणीटंचाई असल्याने पाच एमएलडी अतिरिक्त पाणी मिळावे, अशी मागणी पनवेल महापालिकेने नवी मुंबईकडे केली होती. जून महिन्याच्या सर्वसाधारण सभेमध्ये हा प्रस्ताव फेटाळण्यात आला असून, अतिरिक्त पाणी देण्यास नकार दिला आहे. यामुळे पनवेलकरांना पुरेसा पाऊस पडेपर्यंत पाण्याचा काटकसरीने वापर करावा लागणार आहे. पनवेल महापालिकेला स्वत:चा स्रोत नसल्याने पाणीपुरवठ्यासाठी विविध संस्थांवर अवलंबून राहावे लागत आहे. सद्यस्थितीमध्ये नगरपालिकेचे देहरंग धरण, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व सिडको क्षेत्रामध्ये महापालिकेच्या मोरबे धरणातून पाणीपुरवठा केला जात आहे. पनवेल महापालिकेमधील कामोठे परिसराला नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून जवळपास ३५ एमएलडी पाणी अनेक वर्षांपासून दिले जात आहे. तीव्र उन्हाळ्यामुळे पालिका क्षेत्रामध्ये पाणी टंचाई सुरू आहे. यामुळे पालिका प्रशासनाने नवी मुंबई महापालिकेला पत्र देऊन पाच एमएलडी पाणी मिळावे, अशी विनंती केली होती. सुकापूर येथे १५० मि.मी. व्यासाची जलवाहिनी टाकून त्याद्वारे एप्रिल ते १५ जूनपर्यंत रोज ५ दशलक्ष पाणी मिळावे, अशी मागणी केली होती. पालिकेच्या अभियांत्रिकी विभागाने पाणी देण्याविषयी अनुकुल भूमिका घेतली होती. मोरबे धरणामध्ये पुरेसा पाणीसाठा असल्याने पाणी विकण्यास हरकत नाही, अशी भूमिका घेतली होती. त्या अनुषंगाने प्रस्ताव तयार करून तो सर्वसाधारण सभेकडे पाठविला होता. हा प्रस्ताव मे महिन्याच्या सर्वसाधारण सभेमध्ये मांडण्यात आला होता; परंतु तेव्हा या विषयावर काहीही चर्चा झाली नव्हती. पनवेल महापालिका एमआयडीसीकडून एक हजार लिटरसाठी ९ रुपये या दराने पाणी घेत आहे. त्या दराने महापालिकेने पाणी देण्यास हरकत नाही. पालिकेने पुरविलेल्या पाण्याचा दुरुपयोग झाला. गैरवापर किंवा अपव्यय झाल्यास नळजोडणी खंडित करण्याची तरतूद प्रस्तावामध्ये होती. याशिवाय तीन महिन्यांसाठी अनामत रक्कमही घेण्यात येणार होती. महापालिकेच्या जून महिन्याच्या सभेमध्ये हा प्रस्ताव पुन्हा सादर करण्यात आला. या विषयावर एकही सदस्याने चर्चा केली नाही. बहुमताच्या बळावर सर्वसाधारण सभेमध्ये हा प्रस्ताव फेटाळण्यात आला. यामुळे पनवेलकरांना अतिरिक्त पाणी मिळण्याची आशा संपुष्टात आली आहे. वास्तविक मोरबे धरणामध्ये मुबलक पाणीसाठा आहे.
पनवेलला अतिरिक्त पाणी देण्यास नकार
By admin | Published: June 21, 2017 5:52 AM