थकीत पगार महापालिका कर्मचा-यांच्या खात्यात जमा, भरती प्रक्रियेत अनियमितता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2017 05:20 AM2017-08-25T05:20:40+5:302017-08-25T05:20:46+5:30
पनवेल महानगरपालिकेत समाविष्ट २३ ग्रामपंचायतींमधील ३८४ कामगारांना मागील चार महिन्यांपासून पगार मिळाला नव्हता. भरती प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा ठपका ठेवत आयुक्तांनी चौकशीचे आदेश दिले होते.
पनवेल : पनवेल महानगरपालिकेत समाविष्ट २३ ग्रामपंचायतींमधील ३८४ कामगारांना मागील चार महिन्यांपासून पगार मिळाला नव्हता. भरती प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा ठपका ठेवत आयुक्तांनी चौकशीचे आदेश दिले होते. त्यानंतर कोकण विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे. मात्र या कामगारांना पालिका राबवून घेत असून त्याचा मोबदला देणे अनिवार्य असताना त्यांचा पगार रोखून धरला जात असल्यामुळे कामगार सामूहिक सुटीच्या तयारीत होते. अखेर या पगारासंदर्भात तोडगा निघाला असून या कामगारांना पगार देण्याचे आदेश कोकण आयुक्तांनी दिल्यानंतर गुरुवारी कामगारांच्या खात्यावर पगार जमा झाला आहे.
कामगारांमध्ये लिपिक, सफाई कामगार, प्लंबर, शिपाई, लेखनिक, स्वच्छता कर्मचारी, अभियंता आदींसह अनेक प्रकारच्या कामगारांचा समावेश आहे. गणेशोत्सवाच्या तोंडावर कामगारांचे पगार रखडले असल्याने अनेक कामगार चिंतेत होते. यासंदर्भात शेकाप नगरसेवक हरेश केणी यांनी न्यायालयात धाव घेणार असल्याचा इशारा दिला होता. आमदार प्रशांत ठाकूर यांनी देखील कामगारांसोबत बैठक घेतली होती. मंगळवारी यासंदर्भात पनवेल महानगर पालिकेचे आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांची कोकण आयुक्तांसोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. तत्पूर्वी याच दिवशी या कर्मचाºयांच्या संघटनेचे अध्यक्ष अॅडव्होकेट सुरेश ठाकूर यांनी देखील कोकण आयुक्तांची भेट घेऊन कामगारांचा थकीत प्रश्न त्यांच्या समोर मांडला होता. अखेर कर्मचाºयांना पगार मिळाले असून यामुळे पालिकेच्या तिजोरीवर १ कोटी ७९ लाखांचा बोजा पडणार आहे. दरम्यान, या कामगारांना पालिकेत सामावून घेण्याचा निर्णय अद्याप झालेला नसून २९ आॅगस्ट रोजी कोकण विभागीय आयुक्तांसोबत पालिका प्रशासनाची बैठक होणार आहे.