कर्जत : ‘पेण बँक हे प्रकरण खूप गुंतागुंतीचे आहे. २७ प्रकारचे गुन्हे यामध्ये समाविष्ट आहेत. आजमितीस ६११ कोटी रुपये ठेवीदारांना देणे असले, तरी बँकेकडील जप्त केलेल्या जमिनींची किंमत आठशे ते हजार कोटी रुपयांपर्यंत आहे. आपण आत्तापर्यंत संचालकांना शिक्षा झाली पाहिजे. अशा अन्य विषयांवर आपण लक्ष केंद्रित केले होते. मात्र, पैसे कसे मिळणार? याबद्दल आपल्याला दिशा मिळत नव्हती. आता आपण योग्य दिशेने जात आहोत. पेण, अलिबाग येथील न्यायालयात असलेत्या केसेस ईडीच्या न्यायालयात गेल्या पाहिजेत. त्यांचा हस्तक्षेप दूर झाल्यास ठेवीदारांचे पैसे निश्चित मिळतील,’ अशी माहिती सनदी लेखापाल विक्रम वैद्य यांनी दिली.
पेण अर्बन बँक संघर्ष समितीची बैठक अंबामाता सभागृहात मोहन सुर्वे, प्रदीप शहा व नगरसेवक बळवंत घुमरे यांनी आयोजित केली होती. वैद्य यांनी माहिती सांगताना, ‘आपले १४० कोटी रुपये दुबईत हवाल्यात गेले. १८ कोटी रुपयांना गुजरातमध्ये घेतलेली कंपनीही जप्त करण्यात आली आहे. १३ कोटी रुपयांचे फर्निचर केले आहे. विविध बोगस कंपन्यांची खाती उघडून पैसे काढले आहेत, पण आपल्यासाठी वाईटातून चांगली गोष्ट म्हणजे आपल्या पैशांतून जमिनी विकत घेतल्या म्हणूनच त्या विकून आपले पैसे परत मिळू शकतील.
नवी मुंबईमध्ये असलेली ३५ एकर जमीन विकण्याची परवानगी मिळाल्यास तिची किंमतच ७५३ कोटी रुपये मिळू शकते आणि ठेवीदारांचे पैसे ६११ कोटी आहेत. मात्र, ईडी कडे सर्व केसेस गेल्यावर त्यातून मार्ग निघेल. आपल्या पैशांतून १६६ एकर जागा घेतल्याचे उघड झाले आहे. मी त्यासाठी विना मोबदला काम करीत आहे. त्याला निश्चित यश येईल आणि लवकरच याचा सोक्षमोक्ष लागेल,’ असे सांगितले.
सातत्याने पाठपुरावा
अध्यक्षीय मनोगतात शिरीष बिवरे यांनी, खासदार सुनील तटकरे यांच्यामुळेच ठेवीदारांचे पैसे मिळतील, असा विश्वास असल्याने मी त्यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर, तसेच राज्याचे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याशी संपर्क करून विषय सकारात्मक केला आहे आणि तटकरेच यातून मार्ग काढतील, अशी खात्री आहे.