ठाणे : नवी मुंबई व्हाया ठाणे पूर्व कोपरी ते बोरीवली अशी बससेवा सुरू करताना नवी मुंबई परिवहन प्रशासनाने ठाणे परिवहन सेवेच्या बसथांब्याचा यापूर्वी विनापरवानगी वापर सुरू केला होता. त्यानंतर आता नवी मुंबई परिवहन सेवेने थेट लोकमान्य डेपोतच घुसखोरी केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी त्यांनी प्रादेशिक परिवहन विभागाची मंजुरी घेतली नसल्याचा दावा ठाणे परिवहनने केला आहे. सोबतच नवी मुंबई परिवहनच्या घुसखोरीबद्दल घ्यायच्या धोरणात्मक निर्णयाचा ठराव परिवहन समितीच्या बैठकीसमोर ठेवला आहे. ठाणे परिवहन सेवेच्या ताफ्यात बसेसची संख्या कमी असल्याने त्यांना इतर क्षेत्रात जाता येत नाही. परंतु, इतर शहरांमधील परिवहन विभागाने ठाण्यासह मुंबईतही आपल्या सेवा सुरू केल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर नवी मुंबई परिवहन प्रशासनाने सुरुवातीला ठाणे ते बोरीवली सेवा सुरू करत सॅटीसचा वापर केला. ठाणे परिवहनने त्याला विरोध केला. त्यानंतर, त्यांनी ठाणे पूर्वेतील बसथांब्यावर घुसखोरी केली. त्यानंतर आता नवी मुंबईमार्फत वाशी ते लोकमान्यनगर अशी सेवा सुरू केली आहे. मात्र, त्यासाठी त्यांनी कुठलीही परवानगी न घेता ठाणे परिवहन सेवेच्या लोकमान्यनगर डेपोत घुसखोरी केली आहे, असा ठाणे परिहवनचा आरोप आहे. (प्रतिनिधी)परवानगीची प्रत नाहीप्रादेशिक परिवहन कार्यालयाची परवानगी घेतल्याचे नवी मुंबई परिहवनने सांगितले. परंतु, त्याची प्रत दिली नसल्याचे ठाणे परिवहनचे म्हणणे आहे. त्यामुळे आता या सेवेबाबत परिवहन समितीच्या बैठकीत निर्णय घेण्यात येईल असे, ठाणे परिवहनने स्पष्ट केले.
नवी मुंबई परिवहनची डेपोत घुसखोरी
By admin | Published: March 30, 2017 4:14 AM