गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलावांच्या निर्मितीविषयी उदासीनता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2019 01:30 AM2019-09-01T01:30:38+5:302019-09-01T01:31:04+5:30

तलावांचे सुशोभीकरण सुरू । दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न कायम

Depression over the creation of artificial ponds for Ganesh immersion | गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलावांच्या निर्मितीविषयी उदासीनता

गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलावांच्या निर्मितीविषयी उदासीनता

Next

योगेश पिंगळे

नवी मुंबई : नवी मुंबई या आधुनिक शहरात गणपती आणि देवींच्या मूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची आवश्यकता आणि मागणी असताना त्याकडे महापालिका दुर्लक्ष करीत आहे. महापालिकेने निर्माण केलेल्या तलावात मूर्तींचे विसर्जन केले जात असून, गणेशोत्सव काही दिवसांवर आल्याने तलाव परिसराची डागडुजी आणि सुशोभीकरण करण्याची कामे सुरू करण्यात आली आहेत. मात्र, तलावातील दुर्गंधीयुक्त पाण्याकडे महापालिकेचे दुर्लक्ष असून तलावात विसर्जनाचे काम करणाºया महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न कायम आहे.

नवी मुंबई शहर हे २१ व्या शतकातील शहर म्हणून ओळखले जाते. महापालिकेच्या माध्यमातून शहरात अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून, यामुळे शहराची वेगळी ओळखही निर्माण झाली आहे. शहरात महापालिकेच्या माध्यमातून २४ तलाव बांधण्यात आले आहेत. तलावाजवळील परिसर सुशोभित करण्यात आले असून, अनेक तलावांजवळ उद्याने बनविण्यात आली आहेत. शहरातील तलावांमधील पाण्यात कपडे धुणे आणि अंघोळ करण्यास तसेच तलावात निर्माल्य टाकण्यास मनाई असल्याचे फलकही बसविण्यात आले आहेत. अनेक तलावांजवळ सुरक्षारक्षक नसल्याने नियमांचे उल्लंघन होत आहे. शहरातील नागरिकांना देवी आणि गणेशाच्या मूर्ती विसर्जनासाठी विसर्जन सुविधा उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने शहरात २३ ठिकाणी मूर्तींचे विसर्जन केले जाते. १८ तलावांवर विसर्जन घाटदेखील बांधण्यात आले आहेत.

मूर्तींमुळे तलावात मोठ्या प्रमाणावर गाळ साचत असल्याने तलावाच्या मध्यभागी भिंत बांधून तलावाच्या अर्ध्या भागात मूर्तींचे विसर्जन केले जाते. दरवर्षी तलावांमधील गाळ काढला जात नसल्याने तलावातील पाण्याला दुर्गंधी सुटली आहे. अनेक तलावातील पाण्यावर शेवाळ पसरलेले असून याकडेही महापालिकेच्या माध्यमातून दुर्लक्ष होते. गणेशोत्सव जवळ आल्यावर तलावातील पाण्यावर तरंगणारा कचरा आणि तलाव परिसर स्वच्छ केला जातो. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी महापालिकेच्या सफाई कर्मचाºयांची नेमणूक करण्यात येते. विसर्जनाच्या दिवशी पालिका कर्मचाºयांना दिवसभर तलावातील पाण्यात काम करावे लागते. अस्वच्छ पाण्यामुळे या कर्मचाºयांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या काही वर्षांपासून नागरिक इको फ्रेंडली मूर्तींना प्राधान्य देत असून, अनेक नागरिकांनी इको फ्रेंडली मूर्तींचे इमारतीच्या पिंपातील पाण्यात विसर्जन केले आहे. २०१० साली गणपती विसर्जन काळात पालिकेच्या माध्यमातून शहरातील तीन तलावांजवळ कृत्रिम तलाव बनविण्यात आले होते. या उपक्र माला चांगला प्रतिसाद दिला होता; परंतु त्यानंतर पुन्हा असा प्रयत्न महापालिकेच्या माध्यमातून करण्यात आला नाही. महापालिकेने कृत्रिम तलाव बनवावेत, अशी अनेक नागरिकांची मागणी असून पालिका कृत्रिम तलावासाठी उदासीन असल्याचा आरोप होत आहे.

गणेशमूर्तींची आकडेवारी
वर्ष गणेश मूती गौरी
२०१६ ३३५४४ १०६५
२०१७ ३३७५३ ११३८
२०१८ ३३९४५ १३२९

विभाग संख्या
बेलापूर ५
नेरु ळ २
वाशी २
तुर्भे ३

विभाग संख्या
कोपरखैरणे ३
घणसोली ४
ऐरोली ३
दिघा १
 

Web Title: Depression over the creation of artificial ponds for Ganesh immersion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.