पोलीस मुख्यालयातील सुरक्षेबाबत उदासीनता? सक्षम उपाययोजनांची गरज
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2019 03:54 AM2019-06-23T03:54:33+5:302019-06-23T03:54:47+5:30
कळंबोलीमधील सुधागड शाळा परिसरात जिवंत बॉम्ब आढळल्याची घटना ताजी असताना शनिवारी सकाळी १0 च्या सुमारास एका तरुणाने मुख्यालयात प्रवेश करून मुख्यालयातील इमारतीच्या टेरेसवरून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. योगेश चांदणे असे या तरु णाचे नाव आहे.
- वैभव गायकर
पनवेल - कळंबोलीमधील सुधागड शाळा परिसरात जिवंत बॉम्ब आढळल्याची घटना ताजी असताना शनिवारी सकाळी १0 च्या सुमारास एका तरुणाने मुख्यालयात प्रवेश करून मुख्यालयातील इमारतीच्या टेरेसवरून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. योगेश चांदणे असे या तरु णाचे नाव आहे. मुख्यालयातील जवानाच्या धाडसामुळे त्याला वाचविण्यात यश आले असले तरी या तरु णाने सुरक्षा यंत्रणा भेदून मुख्यालयात प्रवेश केलाच कसा, हा प्रश्न निर्माण झाला आहे. मुख्यालयातील सुरक्षेबाबत उदासीनता होत असल्याचे दिसून येत आहे.
रोडपाली वसाहतीमधील पोलीस मुख्यालयात सुमारे ८५० पेक्षा जास्त पोलीसबल कार्यरत आहे. या व्यतिरिक्त गुन्हे, शिघ्र कृती दल, बॉम्बशोधक पथक, एटीएस, नागरी संरक्षण ही महत्त्वाची कार्यालये आदीसह पोलिसांना सुरक्षेच्या दृष्टीने लागणारी महत्त्वाची सामग्री या ठिकाणी असताना, हा तरुण अशाप्रकारे मुख्यालयात प्रवेश करून आत्महत्येच्या नावाखाली संपूर्ण पोलीस यंत्रणेला वेठीस धरतो, याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेने संपूर्ण मुख्यालयाला एका प्रकारे वेठीस धरले होते. घटनास्थळी अग्निशमन दलालाही पाचारण करण्यात आले होते. शेकडोंच्या संख्येने सर्व जवान या तरुणाच्या जीविताला धोका निर्माण होणार नाही, या दृष्टीने मुख्यालयात सुरक्षा यंत्रणा राबवत होते. शिघ्र कृती दलाचा जवान स्वप्निल मंडलिक याने जीवावर खेळत या तरुणाला आत्महत्या करण्यापासून रोखले. या घटनेत मंडलिक हा गंभीर जखमी झाला आहे. मात्र, पोलीस मुख्यालयातील या चित्तथरारक नाट्यामुळे सुरक्षेबाबतची गंभीर चूक झाल्याचे समोर आले आहे. हा माथेफिरू तरुण मुख्यालयात प्रवेश केल्यानंतर काहीही करू शकत होता, हे नाकारता येणार नाही. प्रचंड सुरक्षा यंत्रणा भेदणे हा प्रकार अतिशय धक्कादायक आहे. नजीकच्या काळात पनवेल परिसरातील घटना पाहिल्या असता हा संपूर्ण परिसर आंतकवाद्यांच्या हिटलिस्टवर आहे, अशा परिस्थितीत पोलीस यंत्रणा आणखीच सतर्क झाली पाहिजे.
सुरक्षा यंत्रणेला सक्त ताकीद
पोलीस मुख्यालयातील या घटनेची गंभीर दखल वरिष्ठ पातळीवर घेण्यात आली आहे. अशाप्रकारे झालेली हलगर्जी भविष्यात होणार नाही, याकरिता सक्त ताकीद वरिष्ठांकडून सुरक्षा यंत्रणेला देण्यात आली आहे.