- नामदेव मोरेनवी मुंबई : पनवेलमधील प्रबळगड व कलावंतीण दुर्गला दरवर्षी जगभरातील २० ते २५ हजार पर्यटक भेट देत असतात. ५०० वर्षांचा इतिहास असलेल्या गडाच्या परिसरातील प्रबळमाची हे गाव मात्र अद्याप सुविधांपासून वंचित आहे. गावात जाण्यासाठी जवळपास तीन किलोमीटर डोंगरातून पायपीट करावी लागत आहे. अद्याप गावापर्यंत पक्का रस्ता झालेला नाही. विद्युत पुरवठा पूर्ण क्षमतेने होत नाही.
रुग्णांना डोलीत घालून रुग्णालयात घेऊन जावे लागत असून, ग्रामस्थांची ही स्थिती पाहून पर्यटकही हळहळ व्यक्त करू लागले आहेत. रायगड जिल्हातील प्रमुख पर्यटनस्थळांमध्ये समावेश असलेल्या कलावंतीन दुर्ग व प्रबळगड परिसराला समस्यांचा विळखा पडला आहे. पनवेलपासून जवळ असलेल्या प्रबळमाची गावात जाण्यासाठी अद्याप पक्का रस्ता नाही. ठाकूरवाडीपासून जवळपास तीन किलोमीटर पायपीट करून गावात जावे लागत आहे. दोनशेपेक्षा जास्त लोकवस्ती गावात आहे.
ग्रामस्थांना किराणा मालासह सर्व वस्तू डोक्यावरून घेऊन जावे लागत आहे. बांधकाम व इतर साहित्याचीही डोक्यावरून वाहतूक करावी लागते. गावामध्ये कोणी आजारी पडले, तर डोलीत घालून त्यांना दवाखान्यात घेऊन जावे लागते. एखादा पर्यटक जखमी झाला किंवा अजारी पडला, तरी त्यालाही डोलीत घालून पायथ्यापर्यंत आणावे लागत आहे. गावामध्ये विजेची सुविधा आहे, परंतु होल्टेज कमी असल्यामुळे पुरेसा प्रकाश पडत नाही. ग्रामस्थांना योग्य दाबाने वीजपुरवठा करणे आवश्यक असून, त्यासाठी सबस्टेशन व इतर कामे करणे आवश्यक आहे.
प्रबळमाची गावात पूर्वी जिल्हा परिषदेची शाळा होती, परंतु डोंगरावर शिक्षक वेळेत येत नसल्यामुळे व इतर अडचणींमुळे शाळा बंद झाली आहे. पहिलीपासून मुलांना आश्रमशाळेत पाठवावे लागत आहे. गावातील गैरसोयी पाहून पर्यटकही हळहळ व्यक्त करू लागले आहेत. प्रबळमाची गावापर्यंत रस्ता व्हावा, अशी मागणी पर्यटकांकडूनच केली जात आहे. रस्ता झाला, तर ग्रामस्थांना सर्व साहित्याची डोक्यावरून वाहतूक करावी लागणार नाही. यामुळे शासनाने रस्ता लवकरात लवकर करावा, अशी मागणी होत आहे.