नवी मुंबई : नवी मुंबईतील एकाधिकारशाहीला घाबरण्याचे कारण नाही. आता तीन पक्षांचे सरकार आहे. त्यामुळे रखडलेली सर्व विकासकामे मार्गी लागतील, असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत विकासाचा मुद्दा केंद्रस्थानी आणला जाईल याचे संकेत दिले.
नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) कायद्यांच्या माध्यमातून देशात धार्मिक भेद निर्माण केला जात असल्याने महाविकास आघाडीची सत्ता आहे, तोपर्यंत महाराष्ट्रात हा कायदा लागू होऊ देणार नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीच भूमिका स्पष्ट केल्याचे त्यांनी सांगितले. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या पहिल्या मेळाव्यात ते बोलत होते.या वेळी माजी मुख्यमंत्री तथा सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण, जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, जलसंपदामंत्री जयंत पाटील, सहकार व कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम, खासदार राजन विचारे आदी प्रमुख नेते व्यासपीठावर उपस्थित होते.
राज्याच्या हितासाठी वेगवेगळ्या विचारधारेचे तीन पक्ष एकत्र आले आहेत. हे सरकार पुढील पाच वर्षे टिकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तिन्ही पक्षांची काम करण्याची व समजावण्याची पद्धत वेगळी आहे. नवी मुंबईतील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. ते सोडवण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही पवार यांनी या वेळी दिली. शिवभोजन योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. येत्या काळात या योजनेचा विस्तार करण्याचा राज्य सरकारचा विचार असून आगामी अर्थसंकल्पात त्यासाठी भरीव तरतूद करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
महाविकास आघाडीचे सरकार समान कार्यक्रमावर चांगले काम करीत आहे. दोन महिन्यांत अनेक क्रांतिकारक निर्णय सरकारच्या माध्यमातून घेण्यात आले आहेत. येत्या काळात नवी मुंबई शहराचा मोठ्या प्रमाणात विकास करायचा आहे. येथील अनेक प्रलंबित प्रश्न निकाली काढायचे आहेत. त्यामुळे येऊ घातलेली महापालिकेची निवडणूक महत्त्वाची आहे. येथील राजकीय मक्तेदारी संपुष्टात आणण्यासाठी महाविकास आघाडी सज्ज झाल्याचे ठाण्याचे पालकमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी या वेळी स्पष्ट केले.
या मेळाव्याच्या माध्यमातून महाविकास आघाडीने जोरदार शक्तिप्रदर्शन केले. या वेळी तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते, नगरसेवक उपस्थित होते. शिवसेनेचे उपनेते विजय नाहटा, राष्ट्रवादीचे नवी मुंबईचे प्रभारी शशिकांत शिंदे, नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष अशोक गावडे, काँग्रेसचे अनिल कौशिक, रमाकांत म्हात्रे, शिवसेनेचे विठ्ठल मोरे, महापलिकेतील विरोधी पक्षनेते विजय चौगुले आदी उपस्थित होते.
‘मी पुन्हा येईन’ विधानाची खिल्ली
महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी विरोधकांनी देव पाण्यात बुडवून ठेवले आहेत. त्यांना आताही परत येण्याचे स्वप्न पडत आहे. मात्र आम्ही तिघे एकत्रित आहोत तोपर्यंत हे शक्य नाही, अशा शब्दांत सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या निवडणूक काळातील ‘मी पुन्हा येईन’ या विधानाची खिल्ली उडविली.