डेब्रिज माफियांवर सीसीटीव्हीची नजर, वनविभागाची उपाययोजना
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2018 04:17 AM2018-12-27T04:17:13+5:302018-12-27T04:17:30+5:30
महापालिका कार्यक्षेत्रामध्ये खारफुटीवर डेब्रिज टाकण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. माफियांना आळा घालण्यासाठी महत्त्वाच्या ठिकाणी कॅमेरे बसविण्याचा निर्णय वनविभागाने घेतला आहे.
नवी मुंबई : महापालिका कार्यक्षेत्रामध्ये खारफुटीवर डेब्रिज टाकण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. माफियांना आळा घालण्यासाठी महत्त्वाच्या ठिकाणी कॅमेरे बसविण्याचा निर्णय वनविभागाने घेतला आहे. वाशीमध्ये दोन ठिकाणी कॅमेरे बसविण्यात आले आहेत.
स्वच्छ भारत अभियानामध्ये नवी मुंबईला घनकचरा व्यवस्थापनामध्ये देशात प्रथम क्रमांक मिळाला आहे. कचरा व्यवस्थापनामध्ये पालिकेने विविध उपाययोजना केल्या आहेत. परंतु डेब्रिज व्यवस्थापनामध्ये प्रशासनाला अपयश येवू लागले आहे. मुंबई व ठाणेमधून बांधकामाचा कचरा नवी मुंबईमध्ये आणला जात आहे. एमआयडीसीसह महामार्गावर मोकळ्या जागेवर शेकडो ट्रक डम्पर टाकले जात आहेत. मुंबईच्या प्रवेशद्वारावर वाशी येथेही पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात डेब्रिज टाकले जात होते. याविषयी प्रसारमाध्यमांमध्येही आवाज उठविला होता.
वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दोन डम्पर पकडून चौघांविरोधात गुन्हेही दाखल केले होते. दोन्ही डम्पर जप्त करून ऐरोलीमध्ये ठेवले आहेत. खारफुटी संवर्धनासाठी न्यायालयाच्या आदेशानंतर स्थापन झालेल्या समितीच्या बैठकीमध्येही या विषयावर चर्चा झाली होती. वाशीमध्ये डेब्रिज माफियांवर नियंत्रण ठेवता यावे यासाठी कॅमेरे बसविण्याचा प्रस्ताव उपवन संरक्षक जयराम गौडा यांनी मांडला होता. त्यानुसार वाशीमध्ये सौर उर्जेवर चालणारे कॅमेरे दोन ठिकाणी बसविण्यात आले आहेत. यामुळे डेब्रिज माफियांवर नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे. शहरामध्ये इतरही ठिकाणी उपाययोजना करण्यासाठीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
नवी मुंबईला विस्तीर्ण खाडीकिनारा लाभला आहे. येथील खारफुटीवर भराव टाकण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. वनविभागाने खारफुटी संरक्षणासाठी आवश्यक त्या ठिकाणी कुंपण घातले आहे. डेब्रिजचा भराव टाकणाºयांवर व इतर मार्गाने खारफुटी नष्ट करण्याचा प्रयत्न करणाºयांवर कारवाई केली जात आहे. वाशीमध्ये कॅमेरा बसविण्याच्या निर्णयाचेही नागरिकांनी स्वागत केले आहे. वनविभागाप्रमाणे महापालिकेनेही डेब्रिज माफियांवर धडक कारवाई सुरू केली तर निसर्गाचा होणारा ºहास थांबविणे शक्य होणार आहे.
वाशीमध्ये दोन ठिकाणी कॅमेरे बसविण्यात आले आहेत. हे कॅमेरे इंटरनेटशी जोडून मोबाइलवर व कार्यालयातील संगणकावरही सर्व माहिती मिळेल अशी यंत्रणा तयार केली जाणार आहे.
- प्रकाश चौधरी,
वनपरिक्षेत्र अधिकारी,
नवी मुंबई