बेशिस्तांना वेसण घालण्याचा ‘देशमुख पॅटर्न
By admin | Published: November 24, 2015 01:45 AM2015-11-24T01:45:04+5:302015-11-24T01:45:04+5:30
अंबरनाथ नगपरिषदेतील सफाई कर्मचारी हे कामावर असतांना इतर व्यवसाय करणे आणि रिक्षा चालवणे हे काम उघडपणे करीत होते.
अंबरनाथ नगपरिषदेतील सफाई कर्मचारी हे कामावर असतांना इतर व्यवसाय करणे आणि रिक्षा चालवणे हे काम उघडपणे करीत होते. हजेरी लावा आणि इतर खाजगी कामासाठी निघून जा, अशी परिस्थिती होती. या कामचुकार कर्मचाऱ्यांमुळे शहरातील दररोजची सफाई अर्धवट राहत होती. या कर्मचाऱ्यांच्या कितीही तक्रारी केल्या तरी हे कर्मचारी मात्र सुधारत नव्हते. या बेशिस्त कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्याची किमया अवघ्या महिन्याभरात साधली ती मुख्याधिकारी गणेश देशमुख यांनी. आज पालिकेतील सर्व सफाई कामगार नियमित कामावर हजर असतात.
अंबरनाथ शहराची लोकसंख्या वाढत असतांना या शहराच्या स्वच्छतेसाठी आवश्यक असलेल्या सफाई कर्मचाऱ्यांची संख्या वाढणे गरजेचे होते. मात्र शासनाच्या आकृतीबंधानुसार अस्तित्वातील कर्मचारीच जास्त दाखविण्यात आले.
आज शहरातील ५७ प्रभागांच्या स्वच्छतेसाठी ८४९ कर्मचारी आहेत. मात्र त्यातील ६० हून अधिक कर्मचारी हे पालिकेच्या विविध विभागात शिपाई म्हणून काम करीत आहेत. त्यामुळे सरासरी ८०० पेक्षा कमी कर्मचारी हे शहरातील स्वच्छतेचे काम करीत आहेत. मात्र प्रभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांपैकी बहुसंख्य कर्मचारी हे केवळ हजेरी बुकावर हजेरी लावून निघून जात होते. एवढेच नव्हे तर काही मुजोर कामगार सकाळी हजेरी लावल्यावर थेट कामावर न जाता खाजगी कामासाठी निघून जात होते. त्यातील काही कामगार हे भाजी विक्रीचे काम करतात तर काही कर्मचारी हे दिवसभर आॅन ड्युटी रिक्षा चालवतात. परत दुपारी शेवटची हजेरी लावण्यासाठी हे हजेरीशेडवर जातात. त्यामुळे हे कर्मचारी केवळ हजेरी लावण्याचा पगार पालिकेकडून घेत असत. त्यांच्या या कामचुकारपणाला प्रत्येक हजेरी शेडवरील अधिकारी देखील तेवढाच जबाबदार होते. कर्मचाऱ्यांना हजेरी लावून देण्यासाठी हेच अधिकारी मदत करीत असत. या कामासाठी संबंधीत अधिकाऱ्याला महिन्याकाठी विशिष्ट रक्कम न देण्यात येत होती. कामचुकार कर्मचाऱ्यांसोबतच इतर प्रामाणिक कर्मचाऱ्यालाही एखाद दिवस काही खाजगी कामानिमित्त जायचे असले तरी त्याचे पैसे या अधिकाऱ्याला मोजावे लागत होते.
कर्मचारी आणि अधिकारी यांचे संगनमत असल्याने अनेक कर्मचारी हे बिनधास्त कामचुकारपणा करित होते. महिला कर्मचाऱ्यांची देखील हीच परिस्थिती होती. त्या देखील हजेरी लावून खाजगी साफसफाईच्या कामासाठी जात होत्या.
मात्र अंबरनाथचे नव्याने नियुक्त झालेले मुख्याधिकारी यांनी कामकाज सुरू करताच सर्वात अगोदर कर्मचारी आणि अधिकारी यांना शिस्त लावण्यासाठी पुढाकार घेतला. सकाळी ७ वाजताच हजेरी शेडवर जाऊन कर्मचाऱ्यांची हजेरी घेण्यात आल्याने कामचुकार कामगार, अधिकारी चांगलेच धास्तावले. पहिल्या धाडीतच त्यांना ८६ कामचुकार कामगार दिसले. तर १२ कामगार नियमित गैरहजर असल्याचे आढळले. सर्व कामगारांना निलंबित करुन आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली. एवढेच नव्हे तर ८६ कामगारांना नोटीस काढली.
ही कारवाई करुन न थांबता आठवड्यातून तीन ते चार दिवस दररोज सकाळी हजेरी शेड आणि शहरातील सफाईच्या कामाची पाहणी करण्याचे काम मुख्याधिकाऱ्यांनी सुरु केले. मुख्याधिकाऱ्यांच्या या भूमिकेनंतर पालिकेचे सफाई कर्मचारी चांगलेच वठणीवर आलेत.
साहेब कधीही येतील, या भीतीने आता प्रत्येक कर्मचारी पूर्ण गणेवेशात कामावर वेळेत हजर राहतात. दुपारी २ वाजेपर्यंत काम करतांना दिसतात. सकाळी १० नंतर प्रभागात न दिसणारे सफाई कर्मचारी दुपारपर्यंत काम करीत असल्याचे पाहून आता नागरिकच अचंबित झाले आहेत. कामचुकार कर्मचारी कामावर नियमित येऊ लागल्याने या कर्मचाऱ्यांना चांगली शिस्त लागल्याचे स्पष्ट दिसत आहे.