बंदी असूनही पर्यटकांची गाढेश्वरला गर्दी

By Admin | Published: July 11, 2016 03:05 AM2016-07-11T03:05:10+5:302016-07-11T03:05:10+5:30

गाढेश्वर धरणावर पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मात्र तरीही मुंबई, ठाण्यातील काही पर्यटकांकडून नामी शक्कल लढवत परिसरातील नदीमध्ये उतरून पावसाचा मनसोक्त आनंद घेतला जात आहे

Despite the ban, the crowd of tourists gathered in Gadhareshwar | बंदी असूनही पर्यटकांची गाढेश्वरला गर्दी

बंदी असूनही पर्यटकांची गाढेश्वरला गर्दी

googlenewsNext


पनवेल : गाढेश्वर धरणावर पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मात्र तरीही मुंबई, ठाण्यातील काही पर्यटकांकडून नामी शक्कल लढवत परिसरातील नदीमध्ये उतरून पावसाचा मनसोक्त आनंद घेतला जात आहे. गाढेश्वर धरण परिसरात बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसांना चकवा देत पर्यटक पाण्यात उतरत असल्याने अनुचित प्रकार अथवा दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
गेल्या महिन्यापासून पावसाचा जोर वाढल्यामुळे गाढेश्वर व मोरबे धरणावर पर्यटकांनी गर्दी केली आहे. दरवर्षी या ठिकाणी दोन ते चार पोलीस कर्मचारी असायचे, मात्र कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी यंदा मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पर्यटकांना गाढेश्वर धरणावर जाण्याची परवानगी नाही. मात्र मुंबई, ठाण्यातील असंख्य पर्यटक गाढेश्वर धरणावर मौजमजा करण्यासाठी येत आहेत. या ठिकाणी धरणावर जाण्यासाठी बंदी असल्याने पोलिसाची नजर चुकवून पर्यटक नदीच्या परिसरात मौजमजा करताना दिसतात. सध्या नेरे, नेरेपाडा, वाजे, हरीग्राम, चिपळे, शांतीवन आदी परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे.
गाढी नदीचे पाणी सध्या वाढले असल्यामुळे पर्यटकांना पाण्यात न उतरण्याचे आवाहन ग्रामस्थ करीत आहेत. मात्र त्याला न जुमानता पर्यटक पाण्यात उतरतात. रविवारी मोरबे धरणात एक पर्यटक खाली पाण्यात पडला, मात्र काहींनी त्याला बाहेर काढल्यामुळे त्याचे प्राण वाचले. गाढेश्वर धरणाकडे येणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांची तपासणी वाजे गावाजवळ केली जात आहे. शिवणसई गावाकडून काही पर्यटक धरण परिसरात जात आहेत. रविवारी बेलापूर येथील बुडणाऱ्या महिलेला वाचवण्यात आले. (वार्ताहर)

Web Title: Despite the ban, the crowd of tourists gathered in Gadhareshwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.