पंकज पाटील
बदलापूर : वांगणी रेल्वे स्थानकात एका अंध महिलेच्या चिमुकल्या मुलाला वाचवण्याचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये मयूर शेळके यांनी दाखवलेले धाडस सर्वांनी पाहिले. मात्र, ज्या दिवशी ही घटना घडली आणि त्या मुलाला मयूर त्यांनी वाचवले, त्या घटनेची कुठेच चर्चा मयूर यांनी स्वतःहून केली नाही. इतरांनाच नव्हे तर मयूर यांनी स्वतःच्या घरात देखील या घटनेची माहिती दिली नाही. दोन दिवसानंतर व्हिडिओ व्हायरल झाल्यावर मयूरच्या या धाडसाची चर्चा सर्व ठिकाणी झाली.
17 एप्रिल रोजी सायंकाळी वांगणी रेल्वे स्थानकावर हा सर्व थरारक प्रकार घडला होता. मयूर यांनी त्या चिमुकल्या मुलाला वाचवले नंतर कुठेही त्याची चर्चा न करता आपलं नियमित काम सुरू ठेवलं होते. एवढेच नव्हे तर घरी गेल्यावरदेखील त्याने आपल्या घरच्यांना त्याची कल्पना दिली नव्हती. एवढं मोठं धाडस दाखवल्यानंतर देखील मयूरने प्रसिद्धीच्या झोतात येण्याचा कोणताही प्रयत्न स्वतःहून केला नाही. मात्र, या रिअल हिरोला खरी प्रसिद्धी दिली ती रेल्वेच्या सीसीटीवी फुटेजने. ज्या क्षणाला घटना घडली आणि मयूरने त्या मुलाला वाचवले, त्या क्षणाला त्याला देखील काही विशेष वाटले नव्हते. त्यामुळे तो आपला नियमित काम करीत राहिला. मात्र, घटना घडल्यानंतर रात्री कर्मचाऱ्यांनी सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यावर मयूरच्या धाडसाची चर्चा केली. पण, तेव्हादेखील मयूरला औत्सुक्य वाटलं नाही. त्याने कुठेही गावात चर्चा केली नाही. योगायोगाने दुसरा दिवस सुट्टीचा असल्याने संपूर्ण दिवस घरी आणि गावातच काढला. तेव्हा देखील त्याने आपल्या मित्रांना घडलेला प्रकार सांगितला नाही.
मयूर हा घरचा एकुलता एक मुलगा असल्याने त्याने घरच्यांची चिंता वाढेल या भीतीपोटी कोणालाही सांगितलं नाही. एवढेच काय तर गेल्या वर्षी लग्न होऊन घरची जबाबदारी सांभाळणाऱ्या स्वतःच्या पत्नीला देखील या घटनेची माहिती दिली नाही. स्वतःहून प्रसिद्धीच्या झोतात न येता देखील मयुरला देशभरात प्रसिद्धी मिळाली हीच त्याच्या धाडसाची खरी पोचपावती ठरली. मयूरचा व्हिडिओ सर्वप्रथम त्याच्या कार्यालयातील वरिष्ठांकडून संबंधित विभागाकडे पाठविण्यात आला. त्यानंतर, ट्विटवरवर तो व्हिडिओ अपलोड झाला अन् पाहात पाहाता साता समुद्रापार गेला. विशेष म्हणजे रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन तो व्हिडिओ शेअर केल्यानंतर देशभरात व्हायरल झाला. त्यामुळे, तुमच्या कर्तृत्वात सामर्थ्य असेल तर, ते जगभरातील लोकांना आवडतं हे पुन्हा मयूरने सिद्ध झालंय.