नवी मुंबई : ऐरोलीमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला मार्बल लावण्याच्या नागरिक व लोकप्रतिनिधींच्या आग्रहाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. विशेष सर्वसाधारण सभेच्या आदेशानंतरही मार्बल लावणे योग्य होणार नसल्याचे पत्र शासनाला दिल्याने आंबेडकरी जनतेमधील नाराजी वाढली आहे. नवी मुंबई महापालिकेने ऐरोलीमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक उभारण्याचे काम सुरू केले आहे. स्मारकाच्या डोमला रंग लावण्याऐवजी मकराना मार्बल लावण्याचा निर्णय सर्वसाधारण सभेने घेतला होता. याविषयी निविदा प्रक्रिया सुरू केल्यानंतर आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आयआयटीच्या अहवालामुळे मार्बल लावण्याचा निर्णय रद्द केला. यानंतर या निर्णयाने पालिकेच्या खर्चात बचत झाल्याचे वृत्त पालिकेच्या वतीने देण्यात आल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढली. आंबेडकर स्मारकासाठी खर्चामध्ये कंजुसी केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आरपीआयचे जिल्हा अध्यक्ष सिद्राम ओहोळ यांनी दिला होता. काँगे्रसच्या नगरसेविका हेमांगी अंकुश सोनावणे यांनी १६ आॅगस्टला लक्षवेधी मांडली होती. या वेळी सर्वपक्षीय नगरसेवकांनी आंबेडकर भवनला मकराना मार्बलच लावण्याचा आग्रह करून तसे न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला होता. आयुक्तांनीही सभागृहाचा आग्रह असल्यास माझी हरकत नाही, असे उत्तर दिले होते. लक्षवेधीमध्ये आयुक्तांनीही मार्बल लावण्यास होकार दर्शविल्यानंतर हा विषय मार्गी लागल्याचा आनंद नागरिकांना झाला; पण प्रत्यक्षात निविदा प्रक्रिया सुरूच झाली नाही. प्रशासनाने पुन्हा मार्बल लावण्यासाठी समिती गठीत केली. या समितीमध्ये आयआयटीचे तज्ज्ञ, सिडको व इतरांचा समावेश होता. या समितीने डोमला मार्बल लावणे योग्य होणार नसल्याचा अहवाल दिला असल्याचे कारण देव्ऊन पुन्हा निविदा प्रक्रियेचे काम ठप्प केले असून याविषयी शासनालाही अहवाल दिला आहे. नागरिकांची इच्छा डावलून प्रशासनाने परस्पर निर्णय घेतल्यामुळे नगरसेवकांसह शहरवासीयांमध्ये असंतोष निर्माण झाला असून याविषयी आंदोलनाची तयारी सुरू झाली आहे. (प्रतिनिधी)मार्बलच लागेलआंबेडकर स्मारकास मार्बल न लावण्याविषयीचा अहवाल प्रशासनाने शासनास दिला आहे. याविषयी पाठविलेल्या पत्रामुळे आंबेडकरी जनतेमध्ये असंतोष निर्माण होऊ लागला आहे. स्मारकास मकराना मार्बलच लावले जाईल तसे न केल्यास आंदोलन उभारण्याची तयारी सुरू झाली आहे.
लक्षवेधीनंतरही आंबेडकर भवनच्या डोमला विरोध कायम
By admin | Published: November 13, 2016 1:38 AM