जागतिक तणावातही निर्यातीत दबदबा कायम; ७७६.६८ अब्ज डॉलर्सच्या वस्तू, सेवा परदेशात पाठवल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2024 05:23 AM2024-04-20T05:23:39+5:302024-04-20T05:24:06+5:30
या वर्षात चीन, रशिया, इराक, संयुक्त अरब आमिरात आणि सिंगापूर आदी देशांमध्ये होणारी निर्यात वाढली आहे.
लोकमत न्यूज नेववर्क, नवी दिल्ली : केंद्रीय व्यापार मंत्रालयाने या आठवड्याच्या सुरुवातीला जारी केलेल्या आकडेवारीनुसार नुकत्याच संपलेल्या २०२३-२४ या आर्थिक वर्षात भारतातून तब्बल ७७६.६८ अब्ज डॉलर्स इतक्या मूल्याच्या वस्तू तसेच सेवांची निर्यात करण्यात आल्याचे म्हटले आहे. वार्षिक आधारावर विचार केला असता हे प्रमाण मागील वर्षाइतकेच आहे. जागतिक अर्थव्यवस्थेतील अडचणी आणि वाढलेला भूराजकीय तणाव यामुळे निर्यातीला फारसा फटका बसलेला नाही.
या वर्षात चीन, रशिया, इराक, संयुक्त अरब आमिरात आणि सिंगापूर आदी देशांमध्ये होणारी निर्यात वाढली आहे. इग्लंड, ऑस्ट्रेलिया, सौदी अरेबिया, नेदरलँड आणि दक्षिण आफ्रिका या देशांना भारतातून मोठ्या प्रमाणात निर्यात केली जाते.
२०२३-२४ या वर्षातील निर्यात
श्रेणी किंमत वाढ/घट
वस्तू ४३७.०६ अब्ज डॉलर्स -३.१%
सेवा ३३९.६२ अब्ज डॉलर्स ४.४%
एकूण ७७६.६८ अब्ज डॉलर्स ————
मार्च २०२४ मधील निर्यात
वस्तू ४१.६८ अब्ज डॉलर्स -०.७%
सेवा २८.५४ अब्ज डॉलर्स -६.३%
२०२२-२३ या आर्थिक वर्षात वस्तू आणि सेवांची एकूण निर्यात ७७५.८७ अब्ज डॉलर्सच्या घरात पोहोचली होती. २०२३-२४ या आर्थिक वर्षात आयात ४.८ टक्के इतकी घटून ८५४.८० अब्ज डॉलर्सवर आली आहे.
सरकारच्या प्रयत्नांना यश
- केंद्र सरकाकडून देशाची निर्यात वाढवित असतानाच आयातीत घट झाली पाहिजे या दृष्टीने विविध उपाययोजना राबवल्या. इलेक्ट्रानिक्स वस्तूंसह इतर अनेक क्षेत्रांसाठी उत्पादन आधारित प्रोत्साहन (पीएलआय) योजना राबविण्यावर भर दिला.
- या उपाययोजनांमुळे भारतातील उत्पादकांमध्ये विश्वास वाढला. जागतिक स्तरावरील उद्योगांशी स्पर्धा करण्यासाठी ते सक्षम बनले. या उपाययोजनांमुळे जागतिक पुरवठासाखळी भारताचे स्थान मजबूत होण्यास मदत झाली आहे.