फ्लेमिंगोंच्या संरक्षणासाठी डीपीएस तळ्यावर कुंपणाचा उतारा
By नारायण जाधव | Published: December 19, 2023 05:02 PM2023-12-19T17:02:19+5:302023-12-19T17:03:15+5:30
नवी मुंबई महानगरपालिकेने हजारो संख्येने फ्लेमिंगोंचे आगमन होत असलेल्या डीपीएस तळ्यावर संरक्षक कुंपण उभारले आहे.
नारायण जाधव,नवी मुंबई:नवी मुंबई महानगरपालिकेने हजारो संख्येने फ्लेमिंगोंचे आगमन होत असलेल्या डीपीएस तळ्यावर संरक्षक कुंपण उभारले आहे. पक्षी निरीक्षकांकडून पक्षांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणे टाळण्यासाठी हा उपक्रम हाती घेतला आहे. उत्साहात अनेक लोक तळ्याच्या कोरड्या भागात अवैधपणे शिरतात आणि दगडफेक करुन पक्ष्यांना त्रास देतात. असे ही निदर्शनास आले आहे की, काही लोक पक्ष्यांना उडायला भाग पाडून त्यांच्या पार्श्वभूमीवर आपली सेल्फी घेतात, असे नॅटकनेक्ट फाउंडेशनचे संचालक बी एन कुमार म्हणाले.
तळ्यावर आरामदायकपणे राहणा-या पक्ष्यांच्या नको एवढे जवळ जाऊन लोक दलदलीमध्ये अडकतात असा इशारादेखील कुमार यांनी इशारा दिला आहे. ही बाब नवी मुंबई मनपाच्या लक्षात आणून दिल्यावर, तत्कालीन आयुक्त अभिजीत बांगर यांनी क्षेत्राभोवती तातकाळ कुंपण घालण्याचे आणि सतर्कतेचे साइन बोर्ड लावण्याचे आदेश दिले होते. सतर्कतेच्या इशा-यांकडे दुर्लक्ष करुन लोक तळ्याच्या क्षेत्राच्या अवतीभवती अजूनही फिरताना आढळतात.कुमार आणि सहकारी पर्यावरण कार्यकर्त्या ज्योती नाडकर्णी यांनी ही समस्या विद्यमान आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या नेल्यानंतर, नार्वेकरांनी या प्रकरणात लक्ष घालण्याचे वचन दिले होते
शहर अभियंता संजय देसाई यांनी हे सांगितले आहे की, महापालिकेचा गेल्या महिन्यामध्ये ११.९६ लाख रुपयांच्या प्रकल्पासाठी निविदा जाहिर केल्या होत्या. त्यानुसार नुकतेच हे काम पूर्ण झाले आहे.
डीपीएसचे आणि शहराच्या इतर पाणथळ क्षेत्रांचे ठाणे खाडे फ्लेमिंगो अभयारण्याच्या (टीसीएफएस) दृष्टिकोनामधून कमालीचे महत्व आहे, कारण भरतीची पातळी १५ सेमीपेक्षा जास्त झाल्यानंतर फ्लेमिंगो उडून इथे येतात. हे दृश्य निसर्गाच्या चाहत्यांसाठी अतिशय नयनरम्य असते.
गेल्या काही वर्षांपासून जेव्हा शहराला फ्लेमिंगो सिटी नाव मिळाल्यावर इथे भेट देणा-या लोकांच्या संख्येत अभूतपूर्व वाढ झाली आहे.डीपीएस तळ्याचा सर्वात मोठा लाभ म्हणजे पाम बीच मार्गाजवळील सर्विस रोडच्या लगत मोठ्या प्रमाणात पार्किंग उपलब्ध आहे, असे कुमार म्हणाले.
आता कुंपण बांधण्याचे हे काम पूर्ण झाल्यावर, हे क्षेत्र माणसे तसेच पक्ष्यांसाठी देखील सुरक्षित होईल, अशी अपेक्षा आहे असे सांगून कुमार यांनी नवी मुंबई मनपाने पाणथळ क्षेत्रावर बांधलेल्या वॉचटॉवर्सकडे पक्ष्यांच्या चाहत्यांचे लक्ष वळवले आहे.