‘नैना’चा तपशील आता मोबाइल अॅपवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2019 11:38 PM2019-07-25T23:38:57+5:302019-07-25T23:39:11+5:30
प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन : बिल्डर्स वेल्फेअर असोसिएशनचा पुढाकार
नवी मुंबई : नैना क्षेत्रातील जमिनीचा तपशील, नकाशे, विकास आराखडा आदींची इत्थंभूत माहिती सहजसोप्या पद्धतीने उपलब्ध व्हावी, या उद्देशाने नैना बिल्डर्स वेल्फेअर असोसिएशनने नैना मोबाइल अॅप विकसित केला आहे. या अॅपचे गुरुवारी सिडकोचे अध्यक्ष प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी नैना बिल्डर्स असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश बाविस्कर व इतर मान्यवर उपस्थित होते.
नैनाच्या विस्तीर्ण क्षेत्रासाठी नियोजन प्राधिकरण म्हणून राज्य सरकारने सिडको महामंडळाची नियुक्ती केली आहे. त्यानुसार सिडकोने नैनाच्या विकासाला सुरुवात केली आहे. नगरपरियोजना अर्थात टीपी स्कीमच्या माध्यमातून या क्षेत्राचा विकास केला जाणार आहे. असे असले तरी या क्षेत्रातील शेतकरी, भूधारक, जमीनमालक, विकासक, वास्तुविशारद आदीना विविध प्रश्नांची सांगड घालावी लागत आहे. या सर्व घटकांचा हा त्रास कमी व्हावा, या उद्देशाने नैना बिल्डर्स वेल्फेअर असोसिएशनने मोबाइल अॅप विकसित केले आहे. नैना मोबाइल अॅप या नावाने विकसित केलेल्या या अॅपचे गुरुवारी सिडकोचे अध्यक्ष प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते त्यांच्या दालनात उद्घाटन करण्यात आले. नैना मोबाइल अॅपची उपयुक्तता अधोरेखित करताना प्रशांत ठाकूर यांनी असोसिएशनच्या कामाचे कौतुक केले. या अॅपमुळे सिडकोचे काम काही प्रमाणात हलके व सुलभ होईल, असा विश्वास प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केला.
नैना बिल्डर्स वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश बाविस्कर यांनी आपल्या छोटेखानी मनोगतानून नैना मोबाइल अॅपची गरज व त्याच्या उपयुक्ततेविषयी माहिती दिली. बांधकाम क्षेत्रासाठी हे अॅप उपयुक्त ठरेल, असा विश्वासही बाविस्कर यांनी व्यक्त केला. याप्रसंगी सिडकोचे नवनियुक्त सह व्यवस्थापकीय संचालक प्रशांत नारनवरे यांनीसुद्धा या अॅपचे कौतुक केले. याप्रसंगी असोसिएशनचे सेक्रेटरी अॅड. संतोष पाटील, खजिनदार दिलीप वढावकर, महाराष्ट्रीय बिल्डर्स असोसिएशनचे मधू पाटील, विकास भांब्रे, एसीएचआय नवी मुंबई युनिटचे रवींद्र देशपांडे आदी उपस्थित होते.