घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक, तीन लाखांचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2019 02:16 AM2019-04-04T02:16:53+5:302019-04-04T02:17:06+5:30
सानपाडा पोलिसांची कारवाई : विविध गुन्ह्यांतील तीन लाखांचा मुद्देमाल जप्त
नवी मुंबई : घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला सानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून विविध गुन्ह्यांतील सुमारे तीन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गतमहिन्यात त्याने डॉक्टर दाम्पत्याच्या घरी घरफोडी केल्यानंतर पुन्हा त्याच परिसरात चोरीच्या उद्देशाने आला असता पोलिसांनी सापळा रचून अटक केली.
गतमहिन्यात सानपाडा येथील डॉक्टर दाम्पत्याच्या घरी दिवसा घरफोडी झाली होती. यामध्ये घरातील सुमारे अडीच लाखाचा मुद्देमाल चोरीला गेला होता. या प्रकरणी सानपाडा पोलीसठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली होती. आरोपीच्या शोधासाठी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासून संशयितांच्या झाडाझडतीला सुरुवात केली होती. या दरम्यान घरफोडीच्या उद्देशाने एक सराईत गुन्हेगार सानपाडा परिसरात येणार असल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक विकास रामगुडे यांना मिळाली होती. यानुसार त्यांनी उपनिरीक्षक महेश करचे, काशीनाथ राहुल, गणेश पवार, रामदास सोनवणे, संदीप कणसे यांचे पथक तयार केले होते. त्यांनी सानपाडा परिसरात ठिकठिकाणी सापळा रचला असता, संशयास्पदरीत्या फिरताना एकाला ताब्यात घेण्यात आले होते. चौकशीत त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी पोलिसांसमोर उघड झाली. यानुसार त्याला अटक करण्यात आली असून, सौरभ देवशरण यादव असे त्याचे नाव आहे. तो सानपाडा सेक्टर ५ येथील राहणारा असून, परिसरात पाळत ठेवून बंद घरांमध्ये घरफोडी करायचा. तर गतमहिन्यात डॉक्टर श्रीप्रकाश यादव यांच्या घरी केलेल्या घरफोडीचीही कबुली त्याने दिली. या गुन्ह्यातील सुमारे अडीच लाखांचा ऐवज व इतर गुन्ह्यातील मोटारसायकल व लॅपटॉप असा तीन लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी त्याच्याकडून जप्त केला आहे. त्याने इतरही अनेक गुन्हे केल्याची शक्यता असल्याने या प्रकरणी सानपाडा पोलीस अधिक तपास करत आहेत.