नवी मुंबई : माजी पोलीस अधिकाऱ्याच्या मुलासह व्यापा-यांना गंडा घालणा-या गुन्हेगाराला जम्मू येथे भारत-पाक सीमेवरून अटक करण्यात आली आहे. या वेळी आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या एपीएमसी पोलीस ठाण्याच्या दोघा पोलिसांना सीमेवरील गोळीबाराचा सामनाही करावा लागला.संजीवकुमार राजपुत (२६) असे एपीएमसी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तो जम्मूमधील नगोर गावचा राहणारा असून एपीएमसी आवारात मोठा व्यापारी म्हणून वावरत होता. या दरम्यान त्याने निवृत्त पोलीस अधिकारी ए. के. शर्मा यांचा मुलगा अजित शर्मा याच्यासह आठ ते दहा व्यापाºयांना गंडा घातला होता. जम्मूमधून सफरचंद व अक्रोड आणून देतो, असे सांगून तो उधारीवर अनेकांकडून इतर फळे घेऊन गेला होता. मात्र, त्या फळांची चंदिगड व परिसरात विक्री करून शर्मा व इतरांना त्याचे पैसे न देता फसवणूक केली होती. या प्रकरणी त्याच्यावर एपीएमसी पोलीसठाण्यात गुन्हा दाखल आहे. तपासादरम्यान राजपुत हा वैष्णोदेवी परिसरात असल्याची माहिती एपीएमसी पोलिसांना मिळाली होती. यानुसार त्याला पकडण्यासाठी पोलीस हवालदार अशोक कचरे व रवींद्र सानप हे दोघेच जम्मूला गेले होते; परंतु तिथे पोहोचल्यावर राजपुत हा भारत-पाकिस्तानच्या सीमेवरील त्याच्या नगोर गावी गेल्याचे समजताच तेही त्या गावाच्या दिशेने गेले. मात्र, हे गाव पाकिस्तानच्या सीमेला लागून असल्याने स्थानिक पोलिसांनीही मदतीसाठी हात वर केले. अखेर भारतीय सैन्याची मदत घेऊन ते राजपुतच्या अटकेसाठी रात्रीच्या अंधारात नगोर गावाकडे निघाले. या वेळी त्यांच्या वाहनांच्या लाइटचा प्रकाश पाहून पाकिस्तानच्या सीमेमधून त्यांच्यावर गोळीबार व तोफगोळे यांचा मारा होऊ लागला. त्यातून स्वत:चा बचाव करत ते सर्व जण राजपुतच्या घरी पोहोचले असता, त्या ठिकाणावरून तो पसार झालेला होता.दरम्यान, त्याच्या घराच्या झडतीमध्ये त्या ठिकाणी दारूचा अड्डाही चालत असल्याचे उघड झाले. यामुळे मुंबईवरून आलेले पोलीस हे उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी असल्याचा बनाव केला, त्यानुसार वडिलांना सोडवण्यासाठी संजीवकुमार राजपुत येताच त्याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. या वेळी फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपीचा पाठलाग करत भारत-पाक सीमेपर्यंत पोहोचणाºया पोलीस हलवादार अशोक कचरे व रवींद्र सानप यांच्या धाडसाचे भारतीय सैन्यानेही कौतुक केले.
फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपीला जम्मूतून अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2019 12:38 AM