अक्षय्य तृतीया मुहूर्तासाठी विकासक सरसावले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2019 01:44 AM2019-05-03T01:44:21+5:302019-05-03T01:45:03+5:30
गुढीपाडव्याच्या मुहूर्तानेही विकासकांना गुंगारा दिला. ग्राहकांकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने रियल इस्टेटमध्ये चिंतेचे वातावरण आहे,
नवी मुंबई : गुढीपाडव्याच्या मुहूर्तानेही विकासकांना गुंगारा दिला. ग्राहकांकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने रियल इस्टेटमध्ये चिंतेचे वातावरण आहे, त्यामुळे आता शहरातील लहान-मोठे विकासक अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधण्यासाठी सरसावले आहेत. त्या दृष्टीने विविध स्तरावर जाहिरातबाजी केली जात आहे. सवलतीच्या घोषणा केल्या जात आहेत.
नवी मुंबईत दिवसेंदिवस घरांची मागणी वाढत आहे; परंतु शहरातील जमिनीचे भाव गगनाला भिडल्याने स्वस्त व परवडणारी घरे बांधणे विकासकांना अवघड होऊन बसले आहे. मागणी व पुरवठा यात मोठ्या प्रमाणात तफावत निर्माण झाली आहे. त्यामुळे दीड-दोन वर्षांपासून घरांची मागणी कमालीची मंदावली आहे. मालमत्ता विकल्या न गेल्याने, बिल्डर्स आणि गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये अडकून पडले आहेत. त्यामुळे रियल इस्टेट मार्केटवर चिंतेची काजळी पसरली आहे. अशा परिस्थितीत गुढीपाडव्याचा मुहूर्त काही प्रमाणात का होईना तारून नेईल, असा विश्वास विकासकांना वाटत होता; परंतु ग्राहकांनी या वेळीही घरखरेदीकडे पाठ फिरविली. त्यामुळे विकासक चांगलेच धास्तावले आहेत. त्यामुळे किमान अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर तरी ग्राहकांअभावी धूळखात पडून असलेल्या मालमत्ता विकल्या जातील, असे विकासकांना वाटत आहे.
त्यानुसार ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. काहींनी तर घरखरेदीवर चक्क डिस्काउंट देऊ केले आहे. तर अनेकांनी आपल्या घर नोंदणीवर आकर्षक सवलत जाहीर केली आहे. एकूणच घरखरेदीच्या प्रतीक्षेत असलेला ग्राहक अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर तरी बाहेर पडेल, असे विकासकांना वाटते आहे.
विविध घटकांचा रिअल इस्टेटवर परिणाम
नोटाबंदी, रेरा आणि जीएसटीमुळे नवीन घरांच्या निर्मितीला काही प्रमाणात खीळ बसली आहे. बड्या गुंतवणूकदारांनी हात आखडता घेतल्याने विकासकांचे धाबे दणाणले आहेत, तसेच सर्वसामान्य ग्राहकांनीही घरखरेदीकडे पाठ फिरविल्याने रियल इस्टेट उद्योगावर मंदीचे सावट निर्माण झाले आहे, त्यामुळे गृहखरेदीला शुभ मानले जाणारे दिवाळी, दसरा, गुढीपाडवा व अक्षय्य तृतीया असे विविध मुहूर्त साधण्याचा प्रयास विकासकांकडून होताना दिसत आहे.