लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : विकासकाची कार अडवून गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना नेरूळमध्ये घडली आहे. बुधवारी संध्याकाळी ते नेरूळमधून जात असताना मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी त्यांची कार अडवून चार गोळ्या झाडल्या. यामध्ये त्यांचा जागीच त्यांचा मृत्यू झाला आहे.
नेरुळ सेक्टर ६ येथे बुधवारी पाच वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली. बेलापूरला राहणारे विकासक शावजी भाई पटेल (५०) हे कामानिमित्ताने नेरुळला आले होते. ४.४५ च्या सुमारास ते नेरुळ सेक्टर ६ येथून जात असताना मोटरसायकलवर आलेल्या दोघांनी त्यांची कार अडवली. यानंतर त्यांच्यावर चार राऊंड गोळ्या झाडून तिथून पळ काढला. यामध्ये पटेल यांचा जागीच मृत्यू झाला असून घटनेवेळी ते कारमध्ये एकटेच होते. घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, सह आयुक्त संजय मोहिते, गुन्हे शाखा उपायुक्त अमित काळे, उपायुक्त विवेक पानसरे यांच्यासह इतर अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते.
व्यावसायिक वादातून त्यांची हत्या झाल्याचा अंदाज पोलिसांकडून वर्तवला जात आहे. यासंदर्भात त्यांच्या कुटुंबीयांकडे पोलिसांनी चौकशी देखील केली आहे. तर घटनास्थळ व परिसरातील सीसीटीव्हीच्या माध्यमातून हल्लेखोरांची माहिती मिळवली जात आहे. त्यासाठी गुन्हे शाखा व स्थानिक पोलिसांची दहा पथके तयार करण्यात आली आहेत. त्याद्वारे लवकरच गोळीबार करणाऱ्यांच्या मुसक्या आवळून हत्ये मागच्या मूळ कारणाचा उलगडा केला जाईल असा विश्वास पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.
मागील काही दिवसांपासून पोलिसांकडून नवी मुंबईतली गुन्हेगारी थोपवण्याचा प्रयत्न होत असतानाच हि घटना घडली आहे. गतवर्षी घणसोलीत देखील अशाच प्रकारे एका विकासकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यामुळे रियल इस्टेट क्षेत्रातली गुन्हेगारी रोखण्याचे आव्हान या घटनेच्या माध्यमातून पोलिसांपुढे निर्माण झाले आहे.