नवी मुंबई: सीवूड येथे विकासकाची कार्यालयातच गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. घटनास्थळी पिस्तूल आढळून आलेले नसल्याने अज्ञाताने त्यांची हत्या केल्याचे स्पष्ट होत आहे. शुक्रवारी रात्री त्यांनी पत्नीला फोन करून कामानिमित्त रात्री कार्यालयातच थांबणार असल्याचे सांगितले होते. शनिवारी सकाळी कर्मचारी कार्यालयात आले असता त्यांचा मृतदेह आढळून आला.
सीवूड सेक्टर ४४ येथील अमन डेव्हलपर्सच्या कार्यालयात हा प्रकार घडला आहे. विकासक मनोज सिंग (४५) यांचा शनिवारी सकाळी कार्यालयात मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच एनआरआय पोलिस त्याठिकाणी गेले असता त्यांच्या डोक्यात गोळी झाडल्याचे उघड झाले. त्यांनी आत्महत्या केल्याची शक्यता वर्तवली जात होती. परंतु घटनास्थळी पोलिसांना पिस्तूल मिळून आलेले नसल्याने त्यांची हत्या झाल्याचे स्पष्ट होत आहे. शुक्रवारी रात्री सिंग यांनी पत्नीला फोन करून रात्री कार्यालयातच एक बैठक असल्याने आपण घरी येणार नसल्याचे सांगितले होते. त्यामुळे रात्रीच्या वेळी त्याठिकाणी कोण आले होते ? हत्ये मागचा उद्देश काय ? याचा अधिक तपास एनआरआय पोलिस करत आहेत.
शनिवारी सकाळी ११ च्या सुमारास कर्मचारी कार्यालयात आले असता सिंग यांचा मृतदेह आढळून आला. त्यांच्या हत्येचा उलगडा करण्यासाठी कार्यालय व इतर ठिकाणचे सीसीटीव्हीचे चित्रीकरण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याद्वारे गुन्ह्याचा उलगडा करण्याचा प्रयत्न नवी मुंबई पोलिस करत आहेत. मात्र या घटनेमुळे नवी मुंबईतील विकासकांमध्ये पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.