नैनाच्या आराखड्यावर विकासकांचा आक्षेप
By admin | Published: October 19, 2015 01:28 AM2015-10-19T01:28:28+5:302015-10-19T01:28:28+5:30
नैना क्षेत्राच्या विकासासाठी सिडकोने कार्यवाही सुरू केली आहे. त्यानुसार पहिल्या टप्याचा विकास आराखडा संपूर्ण प्रक्रियेनंतर अंतिम मान्यतेसाठी शासनाकडे पाठविण्यात आला आहे.
नवी मुंबई : नैना क्षेत्राच्या विकासासाठी सिडकोने कार्यवाही सुरू केली आहे. त्यानुसार पहिल्या टप्याचा विकास आराखडा संपूर्ण प्रक्रियेनंतर अंतिम मान्यतेसाठी शासनाकडे पाठविण्यात आला आहे. असे असले तरी सिडकोने पाठविलेल्या या विकास आरखड्यावर नैना क्षेत्रातील विकासकांनी तीव्र आक्षेप नोंदविला आहे. नागरिकांच्या सुचना व हरकतीला फाटा देत सिडकोने मनमानी पध्दतीने आराखडा व नियमावली तयार केल्याचा आरोप विकासकांनी केला आहे.
नैना क्षेत्राच्या विकासासाठ सिडकोने २३ गावांचा पायलट प्रोजेक्ट हाती घेतला आहे. त्यानुसार विकास आराखडा व नियमावली तयार करून त्याच्यावर नागरिकांच्या सुचना व हरकती मागविण्यात आल्या. या सुचना व हरकतीवर सुनावणी घेवून आवश्यक दुरूस्त्यांसह विकास आराखड्यांचा मसुदा अंतिम मंजुरीसाठी शासनाकडे पाठविण्यात आला आहे. मात्र शासनाकडे पाठविलेला या विकास आराखड्यात नागरिकांच्य एकाही सुचनेचा विचार केला नसल्याचे विकासकांचे म्हणणे आहे.
एकूणच सिडकोने मनमानी पध्दतीने हा विकास आराखडा तयार केल्याचा आरोप नैना बिल्डर्स वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश बाविस्कर यांनी केला आहे. दरम्यान, विकास आराखड्याचा अंतिम मसुदा तयार करताना सिडकोने कोणत्या सुचना स्वीकारल्या व कोणत्या नाकारल्या याची माहिती संबधितांना मिळावी व त्यांना पुन्हा आपले म्हणणे मांडता यावे, यासाठी नियमानुसार ३0 दिवसांची मुदत देण्यात आली होती. ही मुदत उद्या संपत असल्याने नैना क्षेत्रातील विकासक नगरविकास संचालकांकडे यासंदर्भातील आपला आक्षेप नोंदविणार असल्याची माहिती बाविस्कर यांनी दिली. (प्रतिनिधी)