जिल्ह्याच्या विकासाची गाडी धावणार वेगाने
By admin | Published: February 3, 2016 02:20 AM2016-02-03T02:20:26+5:302016-02-03T02:20:26+5:30
रायगड जिल्ह्याच्या विकासासाठी २०१६-१७ या आर्थिक वर्षाकरिता १५१ कोटी ३६ लाख रुपयांच्या वित्तीय आराखड्याला मंजुरी मिळाली आहे
अलिबाग : रायगड जिल्ह्याच्या विकासासाठी २०१६-१७ या आर्थिक वर्षाकरिता १५१ कोटी ३६ लाख रुपयांच्या वित्तीय आराखड्याला मंजुरी मिळाली आहे; तर ४० कोटी ७८ लाख रुपयांच्या वाढीव मागणीला वित्त मंत्रालयाने तत्त्वत: मान्यता दिल्याची माहिती जिल्हा नियोजन अधिकारी सुनील जाधव यांनी दिली. एवढ्या मोठ्या संख्येने रायगड जिल्ह्याच्या विकासासाठी आर्थिक पाठबळ प्राप्त झाल्याने जिल्ह्यात विकासाची गाडी वेगाने धावणार आहे.
२०१५-१६ या आर्थिक वर्षाकरिता हाच आकडा १४९ कोटी ४९ लाख रुपये इतका होता. २०१६-१७ मध्ये त्यामध्ये एक कोटी ८७ लाख रुपयांची अधिक भर पडली आहे. १४९ कोटी ४९ लाख रुपयांच्या निधीपैकी १२० कोटी रुपयांच्या कामांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. उर्वरित ३० कोटी रुपयांच्या निधीचे वितरण येत्या चार दिवसांत करण्यात येणार असल्याचेही जाधव यांनी
सांगितले.
पाणीपुरवठ्याच्या कामांसाठी २५ कोटी रुपये देण्यात आले असून, रस्त्यांसाठी १८ कोटी रुपये, जलयुक्त शिवारासाठी २१ कोटी रुपये, वन विभाग १३ कोटी, साकव बांधणी १० कोटी, नगरोत्थान ९ कोटी, आरोग्य सुविधा सात कोटी, जिल्ह्यातील अंतर्गत रस्ते पाच कोटी, मत्स्यव्यवसाय चार कोटी ५० लाख, शिष्यवृत्ती ४ कोटी, पशुसंवर्धन आणि अंगणवाड्यांसाठी प्रत्येकी ३ कोटी, क्रीडा विभागासाठी दीड कोटी रुपये यांसह अन्य कामांसाठी असा १२० कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्यात आल्याचे जाधव यांनी स्पष्ट केले.
२५ जानेवारीला जिल्हा नियोजन समितीच्या कामाचा आढावा जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले यांनी घेतला होता. संबंधितांनी ३१ मार्चपर्यंत आपापला निधी खर्च करावा. खर्च न करणाऱ्यांवर प्रशासकीय कारवाईचा बडगा उगारण्यात येणार असल्याचा इशारा जिल्हाधिकारी तेली-उगले यांनी यावेळी दिला होता, असेही जाधव यांनी सांगितले.
२०१६-१७ या आर्थिक वर्षांसाठी १५१ कोटी ३६ लाख रुपये मंजूर करण्यात आले असून वाढीव मागणीही करण्यात आली होती. याबाबतची बैठक १ फेब्रुवारीला मंत्रालयात पार पडली होती. (प्रतिनिधी)