द्रोणागिरीचा विकास दृष्टिपथात; पायाभूत सुविधांवर सिडकोचा भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2019 01:03 AM2019-08-09T01:03:41+5:302019-08-09T01:03:48+5:30
विकासक, गुंतवणूकदारांना दिलासा
नवी मुंबई : विविध कारणांमुळे दुर्लक्षित राहिलेल्या द्रोणागिरी नोडच्या विकासाला गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी या नोडच्या विकासावर आपले विशेष लक्ष केंद्रित केले आहे. रस्ते, पदपथ, खेळाची मैदाने, उद्याने आदी अत्यावश्यक सुविधांची कामे हाती घेतली आहेत.
वर्षभरापासून सुरू असलेल्या येथील विकासकामांची सिडकोच्या संबंधित विभागाने अलीकडेच पाहणी केल्याचे समजते. एकूणच सिडकोने हाती घेतलेल्या विकासकामांमुळे द्रोणागिरी नोडमधील विकासक आणि गुंतवणूकदारांनी मात्र समाधान व्यक्त केले आहे.
आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सानिध्यात असलेल्या द्रोणागिरी नोडच्या विकासाबाबत सिडकोची भूमिका सुरुवातीपासूनच उदासीन राहिली आहे. मागील दहा वर्षांत सिडकोने आंतरराष्ट्रीय विमानतळ, नैना प्रकल्प, मेट्रो व नेरुळ-उरण रेल्वे आदी महत्त्वाकांक्षी प्रकल्पावर अधिक लक्ष केंद्रित केले. त्यामुळे द्रोणागिरीच्या विकासाचा मुद्दा मागे पडला. विशेष म्हणजे, या प्रस्तावित नोडमध्ये साडेबारा टक्के योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात भूखंडांचे वाटप करण्यात आले आहे.
निविदा काढून अनेक भूखंडांची विक्री करण्यात आली आहे. यात शैक्षणिक, सामाजिक, निवासी आणि वाणिज्य भूखंडांचा समावेश आहे. पायाभूत सुविधा नसल्याने या भूखंडांचा विकास होऊ शकला नाही. अनेक प्रकल्प अर्धवट अवस्थेत पडून आहेत; परंतु सिडकोने आता द्रोणागिरीच्या विकासावर भर दिला आहे. पुढील वर्षभरात या विभागात पायाभूत सुविधांचे जाळे विणले जाणार आहे.
साडेबारा टक्के योजनेअंतर्गत चुकीच्या पद्धतीने वाटप केलेले भूखंड त्यामुळे विकासाला खीळ बसली. पायाभूत सुविधांचा अभाव आदी कारणांमुळे द्रोणागिरी नोडच्या विकासाला ब्रेक बसला आहे. रस्ते, गटारे व अन्य पायाभूत सुविधांअभावी विकासकामे ठप्प पडली आहेत. अनधिकृत बांधकामांचे पेव फुटले आहे. विकासकांनी महागड्या दराने घेतले भूखंड जैसे थे पडून आहेत. त्यामुळे गुंतवणूकदार आणि विकासकांवर दिवाळखोरीचे संकट ओढावले आहे; परंतु व्यवस्थापकीय संचालकपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर लोकेश चंद्र यांनी सर्वप्रथम द्रोणागिरी नोडचा दौरा करून विकासकामाची पाहणी केली होती. त्यानंतर येथील पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या होत्या, त्यामुळे विकासक आणि गुंतवणूकदारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
महागृहप्रकल्पातील अडीच हजार घरे
सिडकोने गेल्या वर्षी १५ हजार घरांची योजना जाहीर केली. यात द्रोणागिरी नोडमध्ये दोन हजार घरांच्या दोन प्रकल्पांचा समावेश आहे. द्रोणागिरी सेक्टर ११ आणि सेक्टर १२ येथे अनुक्रमे मल्हार गृहसंकुल आणि भूपाळी गृहसंकुल अशी या दोन गृहप्रकल्पांची नावे आहेत. या प्रकल्पातील यशस्वी अर्जदारांना २०२० मध्ये घरांचे वाटप केले जाणार आहे, त्यानुसार या विभागात पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर सिडकोने भर दिला आहे.