नवी मुंबईच्या धरतीवर राजधानी अमरावतीचा विकास
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2024 11:20 PM2024-07-31T23:20:50+5:302024-07-31T23:21:27+5:30
आंध्रच्या मंत्र्यांकडून सिडकोच्या विविध प्रकल्पांची पाहणी
कमलाकर कांबळे, नवी मुंबई : आंध्र प्रदेशची नियोजित राजधानी अमरावतीचा नवी मुंबईच्या धरतीवर विकास करण्याचा निर्णय आंध्र प्रदेश सरकारने घेतला आहे. याचाच एक भाग म्हणून आंध्र प्रदेशचे नगरपालिका प्रशासन व नगर विकास मंत्री, डॉ. पी नारायण गारू यांनी बुधवारी सीबीडी येथील सिडकोभवनला भेट दिली. त्यानंतर त्यांनी सिडकोच्या माध्यमातून उभारलेल्या व प्रगतिपथावर असलेल्या विविध प्रकल्पांची पाहणी केली. याप्रसंगी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
आंध्रमधील अमरावती शहराच्या २१७ चौरस किमी क्षेत्रावर राजधानीचे शहर विकसित करण्यात येणार आहे. या अंतर्गत रस्ते, पाणीपुरवठा, मलनिस्सारण व्यवस्था, दळणवळण, आदी पायाभूत सुविधांसह सचिवालय, विधिमंडळ, उच्च न्यायालयाच्या इमारती विकसित करण्याची योजना आहे. त्याचप्रमाणे शासकीय गृहनिर्मितीही नियोजित आहे. सर्वप्रकारच्या पायाभूत सुविधांनी परिपूर्ण असे स्वयंपूर्ण शहर विकसित करण्याचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या सिडकोच्या नगर नियोजनातील कार्यप्रणाली आणि आर्थिक प्रारूपांचा अभ्यास करण्यासाठी नगरविकास मंत्री डॉ. पी नारायण गारू यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने बुधवारी सिडकोभवनला भेट दिली. विविध प्रकल्पांना भेट दिल्यानंतर सिडकोभवनमध्ये या शिष्टमंडळासाठी विविध प्रकल्पांचे सादरीकरण करण्यात आले.
याप्रसंगी व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांच्यासह सह व्यवस्थापकीय संचालक शान्तनू गोयल, सिडकोचे मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे, एपीसीआरडीएचे आयुक्त कटानेनी भास्कर, अतिरिक्त आयुक्त एम. नवीन, अतिरिक्त आयुक्त प्रवीण चंद तसेच सिडकोचे मुख्य नियोजनकार रवींद्र मानकर, मुख्य अभियंता (नवी मुंबई) एन. सी. बायस, आदी उपस्थित होते.