द्राेणागिरीचा विकास सीआरझेडच्या कचाट्यात, सिडकोच्या २३ विकासकामांचा समावेश
By नारायण जाधव | Published: November 7, 2022 08:47 PM2022-11-07T20:47:36+5:302022-11-07T20:47:49+5:30
१६० व्या बैठकीत मागितला खुलासा
नवी मुंबई : सिडकोने सद्या उलवे, द्राेणागिरीतील विकासावर लक्ष केंद्रीत केले आहे. मात्र या नोडमध्ये कांदळवन क्षेत्र मोठ्या प्रमाणात असून विकासकामांना मर्यादा आहेत. सिडकोने द्राेणागिरी नोडमधील ५० मीटर बफर झोनमधील विविध २३ विकासकामांसाठी सीआरझेडची परवानगी मागितली होती. त्यावर सीआरझेड प्राधिकरणाने सिडकोकडून खुलासा मागितला आहे. ही सर्व कामे सीआरझेडच्या कचाट्यात सापडली आहेत.
संपूर्ण नवी मुंबई शहर हे ठाणे खाडीमुळे सीआरझेडच्या परिघात मोडते. यामुळे या शहरात कोणतेही विकासकामे करताना नवी मुंबई महापालिका, पनवेल महापालिका असो वा सिडको महामंडळ अथवा एमएमआरडीए या प्रत्येकाला ही कामे विकासकामे करण्यासाठी महाराष्ट्र सागर किनारा प्राधिकरणाची अर्थात सीआरझेडची मान्यता घ्यावी लागते. अशाच प्रकारे सिडकोने द्राेणागिरी नोडमधील ५० मीटर बफर झोनमधील विविध २३ विकासकामांसाठी सीआरझेडची परवानगी मागितली होती.
या विकासकामांमध्ये तीन कामे सीव्हरेज ट्रिटमेंट प्लान्ट, पंप हाऊसची आहेत. तर, सेक्टर-५१,५२ आणि ५५,५६ मधील होल्डिंग पाॅडवरील पूल, २२ मीटरचा नाला बांधणे, आठ नाल्यांची सफाई, आठ सेवा रस्त्यांचे बांधकाम यांचा समावेश आहे.
या प्रश्नांची उत्तरे द्या...
सीआरझेडच्या १६० व्या बैठकीत याबाबतचा प्रस्ताव चर्चेसाठी आला असता प्राधिकरणाने सिडकोकडून ठोस खुलासा व स्पष्टीकरण मागितले आहे. यात प्राधिकरणाने म्हटले आहे, सिडकोने ही कामे आधीच पूर्ण केली आहेत काय. की सिडको नव्याने परवानगी मागत आहे, की कार्योत्तर मंजुरी मागत आहे. सीआरझेड प्राधिकरणाच्या या प्रश्नांना उत्तरे आता सिडकोला द्यावी लाणगार आहेत.
पावणे दोन लाख चौरस मीटर खारफुटी बाधित
सीव्हरेज ट्रिटमेंट प्रकल्प
सेक्टर ५६ व ५९ मध्ये ६१६९८ चौरस मीटर क्षेत्रात १०८ एमएलडी क्षमतेचा सीव्हरेज ट्रिटमेंट बांधण्यात येणार असून त्यात खारफुटी जाणार आहे. हा परिसर सीआरझेड १ ए मध्ये मोडतो. तर सेक्टर ५१ ए मध्ये ५९१५ चौरस मीटर जागेवर पंप हाऊस बांधण्यात येत असून यात ही खारफुटी बाधित होणार आहे.
सेवा रस्त्यांचे बांधकाम
विविध रस्त्यांसाठी सेक्टर १५ मध्ये ४३२२ चौरस मीटर, १५ ए मध्ये ७३३४ चौरस मीटर, सेक्टर ४१ मध्ये २३९१ चौरस मीटर, चौरस मीटर, सेक्टर ४८ मध्ये ५८९६ चौरस मीटर, सेक्टर ५० मध्ये २९८४ चौरस मीटर, सेक्टर ५६ मध्ये १५४५०चौरस मीटर, सेक्टर १५ मधील एसटीपी शेजारी २८६९ चौरस मीटर, सेक्टर २७ मध्ये सीआरझेड क्षेत्र बाधीत होत आहे.
नाल्यांची स्वच्छता
सिडकोने सेक्टर ४७ ते ५५ मध्ये नाल्यांची स्वच्छता करण्याचा निर्णय घेतला असून यात मोठ्याप्रमाणात खारफुटी बाधित होणार आहे.
बफर झोन
हे क्षेत्र सीआरझेडच्या ५० मीटर बफर झोनमध्ये मोडते. यात सेक्टर ४७ मध्ये १०४८८ चौरस मीटर, सेक्टर ४८ मध्ये ४५१७ चौरस मीटर, सेक्टर ५० मध्ये ८३७६ चौरस मीटर, सेक्टर ५१ मध्ये १२०९६ चौरस मीटर, सेक्टर ५२ मध्ये आणि सेक्टर ५३ मध्ये प्रत्येकी ७७८९ चौरस मीटर तर सेक्टर ५४ आणि ५५ मध्ये प्रत्येकी ८२९० चौरस मीटर असे एक लाख ७० हजार ६३१ चौरस मीटर खारफुटी क्षेत्र बाधित होत आहे.