नारायण जाधव, उपवृत्तसंपादक
स्थापनेनंतर तब्बल ३२ वर्षांनी नवी मुंबई महापालिकेने तयार केलेल्या प्रारूप विकास आराखड्याची रचना आणि उठवलेली आरक्षणे पाहता, तो नवी मुंबईला नजीकच्या भविष्यात ‘व्हर्टिकल स्लम’कडे नेणारा असल्याची भीती याच सदरात गेल्या वर्षी ३ एप्रिल २०२३ रोजी व्यक्त केली होती. आता जनतेकडून आलेल्या हरकती व सूचनांवर कोणतीही अंमलबजावणी न करता, तो आहे तसाच किंबहुना, राज्यकर्त्यांच्या दबावाखाली त्यांच्या हिताचे महत्त्वाचे बदल महापालिकेच्या नगररचना विभागाने केल्याचेच दिसत आहे. त्यामुळे येत्या काळात नवी मुंबईची ठाणे, कल्याण, डोंबिवली, भिवंडी या ठाणे जिल्ह्यांतील शहरासारखी बजबजपुरी कशी होईल, याचीच पुरेपूर काळजी घेतल्याचे दिसत आहे.
विकास आराखडा तयार करताना माणसाला जन्मापासून मरणापर्यंत जे जे लागते ते म्हणजे रुग्णालय, शाळा, मैदान, करमणूक केंद्र, बाजारहाट, बस, रेल्वे स्थानके ते स्मशानभूमीपर्यंतच्या सर्व घटकांचा यात विचार व्हायला हवा. नवी मुंबईच्या विकास आराखड्यात लोकसंख्येच्या तुलनेत एकूण मोकळे क्षेत्र, एमआयडीसीत दिलेली निवासी बांधकामांना परवानगी आणि सिडकोच्या जुन्या इमारतींच्या जागी पुनर्विकासाच्या नावाखाली येणारे उत्तुंग टाॅवर पाहता, त्यात आधुनिकता असेल, असे वाटले होते; परंतु नगररचना विभागाने राज्यकर्ते आणि बिल्डरांच्या दबावाखाली आहे त्या मोकळ्या जागा, पार्किंग क्षेत्र, हरितपट्टेच नव्हे तर जागतिक रामसर क्षेत्रासह फ्लेमिंगो अभयारण्याच्या परिसरात बांधकामांसाठी लागू असलेल्या बंधनांना ठाणे खाडीत बुडवल्याचे शासनाकडे मंजुरीसाठी पाठवलेल्या प्रारूप आराखड्यात दिसत आहे.
वास्तविक, नगररचना कायदा १९६६ नुसार स्थानिक स्वराज्य संस्थेची स्थापना झाल्यानंतर शासनाच्या नगररचना अधिकाऱ्यांनी चार वर्षांतच शहराचा विकास आराखडा तयार करून शासनाची मंजुरी घेऊन त्यानुसार काम करणे अभिप्रेत असते; परंतु येथील नगररचना अधिकाऱ्यांनी या ३२ वर्षांत सीसी/ओसी देऊन बिल्डरांची सेवा करण्यातच धन्यता मानली आहे.
रामसर क्षेत्र परिसरात उभी राहणार बांधकामेठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्य १६.९०५ चौरस किलोमीटर क्षेत्रावर पसरलेले आहे. खाडीचे अंदाजे ६५ चौरस किलोमीटरचे क्षेत्र जागतिक दर्जाचे रामसर स्थळ घोषित असून, यात १७ चौरस किलोमीटरमध्ये अभयारण्याचे क्षेत्र आहे. उर्वरित ४८ चौरस किलोमीटर ही जागा पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र म्हणून ऑक्टोबर २०२१ मध्ये अधिसूचित आहे. नवी मुंबई शहराची ‘फ्लेमिंगो सिटी’ म्हणून ओळख करून देण्यात येत आहे. याच फ्लेमिंगोंचा अधिवास असलेल्या पाम बीच परिसरात नव्या विकास आराखड्यात बांधकामांना वाट मोकळी करून दिली आहे. देशातील एका मोठ्या उद्योगपतीचा बंगलो प्रकल्पही येथेच उभा राहत आहे.
प्रादेशिक उद्यान बिल्डरांना आंदणनवी मुंबई महापालिकेने १६ नोव्हेंबर १९९५ रोजी अडवली-भूतवली-बोरिवली गावांमधील ६४४.७८ हेक्टर जमिनीवर प्रादेशिक उद्यानाचे आरक्षण टाकले होते. यातील ५१३.९२ हेक्टर जमीन ही वन खात्याची तर १३०.८६ हेक्टर जमीन खासगी मालकीची हाेती. या संपूर्ण क्षेत्रावर ॲम्युझमेंट पार्क प्रस्तावित होते. मात्र, एमआरटीपी कायदा १९६६ मधील ३७ (१) च्या तरतुदींची पूर्तता न करता नव्या विकास आराखड्यात हे आरक्षण उठवून तिथे निवासी आणि वाणिज्यिक बांधकामांना ठाणे आणि नवी मुंबईतील राज्यकर्त्यांच्या हितासाठी परवानगी दिली आहे.