नैना क्षेत्रातील उर्वरित गावांसाठी विकास आराखडा
By admin | Published: November 11, 2016 03:20 AM2016-11-11T03:20:10+5:302016-11-11T03:20:10+5:30
नैना क्षेत्राच्या पहिल्या टप्प्याचा विकास आराखडा मंजुरीच्या प्रतीक्षेत असतानाच सिडकोने तिसऱ्या टप्प्यातील उर्वरित गावांचा विकास आराखडा तयार करून त्यावर
नवी मुंबई : नैना क्षेत्राच्या पहिल्या टप्प्याचा विकास आराखडा मंजुरीच्या प्रतीक्षेत असतानाच सिडकोने तिसऱ्या टप्प्यातील उर्वरित गावांचा विकास आराखडा तयार करून त्यावर नागरिकांच्या सूचना व हरकती मागविल्या आहेत. या टप्प्यात नैना क्षेत्रातील २0१ गावांचा समावेश आहे. एमआयडीसी आणि रस्ते विकास महामंडळाकडे वर्ग झालेली गावे यातून वगळण्यात आली आहेत.
नवी मुंबई विमानतळ प्रभावित क्षेत्रातील २७० गावांतील सुमारे ६०० चौरस किलोमीटर क्षेत्राचे नियोजन प्राधिकरण म्हणून राज्य सरकारने सिडकोवर जबाबदारी सोपविली आहे. त्यानुसार सिडकोने नैना प्राधिकरणाची स्थापना केली आहे. त्यामाध्यमातून नैना प्रकल्पाचा टप्प्याटप्प्याने विकास करण्याची योजना सिडकोने आखली आहे. पहिल्या टप्प्यात पनवेल तालुक्यातील २३ गावांचा समावेश करण्यात आला आहे. याचा प्रारूप विकास आराखडा तयार करून नागरिकांच्या सूचना व हरकतीसह तो अंतिम मान्यतेसाठी राज्य सरकारकडे पाठविण्यात आला आहे. त्याला पुढील आठवडाभरात मुख्यमंत्र्यांंची मंजुरी मिळेल, असा विश्वास सिडकोने व्यक्त केला आहे. दुसऱ्या टप्प्यात प्रस्तावित खालापूर स्मार्ट सिटीअंतर्गत मोडणाऱ्या ११ गावांचा समावेश करण्यात आला आहे. पहिल्या व दुसऱ्या टप्प्यांसह सिडकोने नैनाच्या तिसऱ्या टप्प्यात मोडणाऱ्या गावांच्या विकासाच्या दृष्टीने कार्यवाही सुरू केली आहे. यासंदर्भातील प्रारूप विकास नियंत्रण नियमावली तयार करण्यात आली आहे. गेल्या महिन्यात झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत त्याला मान्यताही देण्यात आली आहे. त्यानुसार सिडकोने त्यावर नागरिकांच्या सूचना व हरकती मागविल्या आहेत.
विशेष म्हणजे, २३ गावांच्या पायलट प्रोजेक्टचा विकास आराखडा गेल्या वर्षभरापासून लालफितीच्या विळख्यात अडकला आहे, असे असले तरी लवकरच त्याला राज्य सरकारची मंजुरी मिळेल, असा विश्वास सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांनी व्यक्त केलाआहे. दरम्यान, पहिल्या टप्पा सात वर्षांत पूर्ण करण्याचे सिडकोचे उद्दिष्ट आहे, तर ११ गावांचा समावेश असलेल्या खालापूर स्मार्ट सिटीचा प्रकल्प पुढील वर्षापासून हाती घेण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)